
रस्त्याने चाललेल्या तरूणाला अडवून कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या तिघा सराईतांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना 9 मार्चला आंबेगाव बुद्रूक परिसरात घडली होती.
विनोद दिलीप धरतीमगर (वय 20), भुवारक सरदार जमादार (वय 22), सरदार काशिम जमादार (वय 42, सर्व रा. आंबेगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हनुमंत चंद्रकांत गद्रे (वय 48, रा. आंबेगाव ब्रुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गद्रे हे 9 मार्चला रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या घराजवळून चालत निघाले होते. त्यावेळी तिघा आरोपींनी त्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखविला.
त्यांना हाताने व दगडाने मारहाण करत खिशातील एक हजाराची रोकड आणि 15 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला होता. त्यांच्या दहशतीमुळे नागरिकांनी पळ काढत दुकानदारांनी दुकाने बंद केली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढून मुसक्या आवळल्या. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे यांच्या पथकाने केली.
























































