पुणे जिल्ह्यातील शाळांची घंटा सोमवारपासूनच, टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू होणार

प्रातिनिधिक फोटो

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील शाळांचे नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सोमवार पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील शाळा सोमवार पासून सुरू न करण्यासंदर्भात आयुक्तांनी निर्णय घेतले आहेत. परंतु ग्रामीण क्षेत्रातील शाळेची घंटा सोमवारीच वाजणार आहे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे त्या सुरू होतील यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत.

माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे म्हणाले, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सोमवारपासून टप्प्याटप्प्याने सुरू होतील. माध्यमिक शिक्षकांना त्यांची कोरोना टेस्ट करून घ्यावयाची आहे. तसेच शाळांच्या वर्ग खोल्यांमध्ये साफ-सफाई स्वच्छता कोरोना विषयक नियमावलीचे पालन करण्यासाठीची व्यवस्था  करण्याचे काम सुरू आहे. शिक्षकांच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर त्याप्रमाणे शिक्षक शाळांवर अध्यापनाचे काम सुरू करतील.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाची नियमावली आणि जिल्हास्तरावर घ्यावयाच्या खबरदारी संदर्भात आदेश काढले. शाळा खोल्यांचे निर्जंतुकीकरण करणे तसेच सनिटेशन याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समित्यांवर देण्यात आली आहे. या आदेशाप्रमाणे सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू होतील असेही त्यांनी स्पष्ट केले.ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी कोरोना टेस्टिंगसाठी एकच केंद्र उपलब्ध असल्याने शिक्षकांच्या टेस्ट करून घेण्यासाठी वेळ लागत आहे.

मंगळवारी परिवहन प्राधिकरण घेणार आढावा

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि व्हॅन, बसेसच्या संदर्भात नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थी वाहतूक संघटना पालक शाळांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करण्याच्या सूचना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिवहन प्राधिकरणाची बैठक देखील मंगळवारी बोलवण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेत सोमवारी शिक्षण विभागाची बैठक

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद क्षेत्रातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू होत असल्याने त्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सोमवारी सकाळी  बैठक बोलावली आहे. उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती रणजित शिवतारे यांनी वर्ग सुरू करताना  कोरोना विषयक नियमावली आणि शासनाच्या सूचनांचे पालन तसेच तयारीचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या