वडिलांच्या सततच्या आजारपणाला कंटाळून बेवड्या मुलाने चिरला वडिलांचा गळा

प्रातिनिधिक फोटो

वडिलांच्या सततच्या आजारपणाला कंटाळून मद्यपी मुलाने मी यांना कायमचं मुक्त करतो, असे म्हणत त्यांचा गळा दाबून ब्लेडने वार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील उरळी कांचनमधील तुपे वस्तीवर घडली आहे. रहिम गुलाब शेख (67) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नईम रहिम शेख (वय 38) असे खून केलेल्या मुलाचे नाव आहे. मुलगी शैनाज रशीदखान जामदार (40) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिम शेख आजारी असल्याने त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरू होते. त्यांची कोरोना चाचणी करुन घेतली होती. वडील आजारी असल्याने मुलगा रईम शेख याने त्यांच्यासोबत मंगळवारी (दि. 8) वाद घातला होता. भांडणातच त्याने सायंकाळच्या वेळी रहिम यांचा गळा ब्लेडने चिरुन त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने कुटूंबातील सदस्यांना घटनेची वाच्यता केली तर तुमचा खून करू अशी धमकी दिली होती.

मात्र, रहिम यांची मुलगी शैनाज यांनी धैर्य दाखवून हत्येची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान वडीलांचा खून करुन आरोपी नईम नशेत उरुळी कांचन रेल्वे स्थानक परिसरात फिरत होता. पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत खूनाची तक्रार घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील,सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते , वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी घटनास्थळाला भेट दिली.

आजारी वडिलांचा गळा दाबून त्यांच्यावर वार करीत खून केल्याप्ररकणी आरोपी मुलाला ताब्यात घेतले. यासंदर्भात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते
-सुभाष काळे, पोलीस निरीक्षक , लोणी काळभोर

आपली प्रतिक्रिया द्या