
पतंग पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला विजेच्या खांबाला लटकणाऱ्या तारेचा स्पर्श झाल्यामुळे वीजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यु झाला. घटना काल संध्याकाळी सहा वाजता लोहियानगर येथे घडली.
सैफ शेख (वय १८, रा. लोहियानगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ हा लोहिया नगर येथील अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रासमोरील गल्लीमध्ये राहत होता. काल संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास त्याच्या घरासमोरील विजेच्या खांबावरील तारेला एक पतंग लटकलेला त्याला दिसला. पतंगाचा मांजा खाली आला असल्यामुळे सैफने घराच्या गच्चीतुन मांजा पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खांबाजवळील तारेला त्याचा हात लागला. त्यामुळे त्याला जोरदार वीजेचा धक्का बसला. त्याच्या आईने व इतरांनी सैफला तेथून बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.




























































