
सामना प्रतिनिधी। पुणे
जमीन वाटपाची केस चालविण्यासाठी वकिलाच्या नावाने 20 गुंठे जमीन करून देण्यात आली. मात्र, हे प्रकरण न्यायालयात जाण्यापूर्वीच त्यामध्ये तडजोड झाल्याने शेतकरी असलेल्या अशीलाने वकिलाकडून 20 गुंठे जमीन परत मिळवली. यावेळी वकिलाने जमीन परत करताना 2 लाख रूपये घेतले आणि ते पैसे परत केले जातील असे सांगितले. मात्र दोन तीन वर्ष वकिलाकडे खेटे मारूनही पैसे परत मिळाले नाही. यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने वकिलावर गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या युनीट एकने खेड येथून अटक केली. कुरूमदास काळुराम बढे असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर देवानंद रत्नाकर ढाकणे( 42) असे वकिलाचे नाव आहे.
ढाकणे यांच्यावर सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास संगमवाडी पुलाजवळ बढेने चार गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणण्यात आला आहे.
या गोळीबाराचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनीट एकने ढाकणे यांची माहिती काढली. ढाकणे याचे एका अशिलाशी पैशावरून वाद सुरू होता, त्यानेच हल्ला केल्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सचिन जाधव, श्रीकांत वाघवले यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्या पथकाने हल्लेखोंराची माहिती काढण्यास सुरूवात केली. हल्लेखोर चाकण जवळ असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हल्ला करणारे दोघे खेड येथील दोंदे गावात शेतात लपून बसल्याचे कळाल्यानंतर युनीट एकचे उपनिरीक्षक दिनेश पाटील व यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी दोघांना शेतातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तुलही जप्त केले .
बढे याच्या वडीलोपार्जित जमिनीचा वाद होता, त्याला कमी जमीन मिळाल्याने याविरोधात त्याने न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी 2011 मध्ये अॅड. ढाकणे यांच्याशी चर्चा केली. ढाकणे यांनी सांगितलेली फिस त्याला देणे शक्य नसल्याने बढेने त्यांच्या नावावर 20 गुंठे जमीन करून दिली. बढेच्या काही नातेवाईकांनी प्रयत्न केल्याने हे प्रकरण न्यायालयाबाहेर मिटविण्यात आले. या खटल्याबाबत काहीच प्रक्रिया न झाल्याने बढेने अॅड. ढाकणे यांना ही जमीन परत मागितली. त्यानुसार ढाकणे यांनी ही जमीन परत केली. मात्र, २ लाख रूपये काही काळ वापरण्यासाठी मागितले. बढेने व्याजाने पैसे काढून अॅड. ढाकणेंना 2015 मध्ये पैसे दिले. गेल्या तीन वर्षांपासून तो ढाकणे यांना अनेकदा पैसे मागितले, तरीही ते देण्यास तयार नव्हते. त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी बढेने उत्तरप्रदेशातील मेरठ येथे जाऊन गावठी कट्टा विकत आणला. त्याचा वापर करून त्याने ढाकणे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. बढे हा सध्या राजगुरूनगरच्या टोलनाक्यावर कामाला आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. ढाकणे यांची चौकशी केल्यानंतर त्यांची बाजू समोर येइल, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांनी सांगितले.



























































