फास्ट टॅग’ नाही…. मग, दुप्पट टोल भरा !

1095

कॅशविना इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी 1 डिसेंबरपासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य महामार्ग आणि शहरी टोलनाक्यावर ‘फास्ट टॅग’ने टोल स्वीकारला जाणार आहे. ज्या वाहनांवर ‘फास्ट टॅग’ नसेल त्या वाहनचालकाकडून दुप्पट टोल वसूल करण्यात येणार आहे.

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत गेल्या महिन्यात डिसेंबरपासून ‘फास्ट टॅग’ लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रोग्रॅमअंतर्गत 1 डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांवर ‘फास्ट टॅग लावणे अनिवार्य केले आहे. ‘फास्ट टॅग’च्या माध्यमातून वाहनांना टोलनाक्यावर न थांबता टोल चुकता करता येणार आहे. त्यासाठी वाहनांवर ‘फास्ट टॅग’ लावणे आवश्यक आहे. हा ‘फास्ट टॅग’ बँकांकडून खरेदी करता येणार आहे. टोलनाक्यावर ऑटोमॅटिक ट्रान्स्जेक्शनसाठी वाहनाच्या विंडस्क्रीनमध्ये ‘फास्ट टॅग’ लावला जातो.

त्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन लागले असते. वाहन टोलनाक्याजवळ जाताच सेन्सर टॅगला स्कॅन करतो. त्यानंतर ‘फास्ट टॅग अकाउंटमधून शुल्क कापले जाते. खात्यातील रक्कम संपल्यानंतर रिचार्ज करावा लागतो. ‘फास्ट टॅग’ची वैधता ही पाच वर्षांची असणार आहे. अर्थात पाच वर्षांनंतर वाहनचालकांना दुसऱ्यांदा ‘फास्ट टॅग लावावा लागणार आहे. कोणत्याही वाहनचालकाला आपल्या ‘फास्ट टॅग अकाउंटला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून रिचार्ज करता येते. ‘फास्ट टॅग खाते कमीत-कमी 100 रुपये, तर अधिकाधिक एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेने रिचार्ज करता येऊ शकणार आहे.

शिवाय एसबीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस, पंजाब नॅशनल बँकांसह पेटीएमच्या माध्यमातून ‘फास्ट टॅग अकाउंट करता येते. ‘फास्ट टॅग’साठी वाहनाची आरसी, वाहनमालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो, केवायसी कागदपत्रे आणि घराचा पत्ता असलेले एक कागदपत्र आवश्यक असणार आहे. ‘फास्ट टॅग लागलेले वाहन कोणत्याही टोलनाक्यावरून जात असेल व चालकाच्या ‘फास्ट टॅग खात्यातून रक्कम कापली जाताच, वाहनचालकांच्या मोबाईलवर एक मॅसेज येणार आहे. त्या माध्यमातून ‘फास्ट टॅग’ अकाउंटमधून किती रक्कम कापली, याची माहिती समजणार आहे.

‘फास्ट टॅग’ चे फायदे
‘फास्ट टॅग एक पारदर्शी व्यवस्था असून, मोटारीवर लागलेल्या ‘फास्टटॅग’च्या मदतीने वाहनचालकांची वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे टोलनाक्यावर वाहतुकीची कोंडी होणार नाही. वाहनात कोण बसले आहेत, त्याचीही माहिती मिळणार आहे. त्यामुळे गुन्हे आणि गुन्हेगारांवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे. ‘फास्ट टॅग’ला जीएसटी नेटवर्कसोबत जोडण्यात आले आहे. या यंत्रणेत वाहनमालक आणि वाहनाची माहिती असल्याने ही यंत्रणा आधारच्या धर्तीवर काम करणार आहे. इतकेच नव्हे, तर सर्व मार्ग ‘फास्ट टॅग’चे झाल्यास केवळ एकाच मार्गावर रोख स्वीकारली जाणार आहे. ‘फास्ट टॅगचा उपयोग करणाऱ्यांना ‘कॅशबॅक’चा फायदाही मिळणार आहे.

या अडचणी केव्हा दूर होणार ?
‘फास्ट टॅग’मुळे वाहनचालकांना फायदा मिळेल. पण सध्या टोलनाक्यावर ‘फास्ट टॅग’बाबत ज्या अडचणी येत आहेत, त्यावर वाहनचालकांना खरंच दिलासा मिळेल का, हा प्रश्न गंभीर आहे. टोलनाक्यावर आताही नेटवर्कची समस्या असल्यामुळे बहुतांशवेळी वाहनचालकांना थांबावे लागते. अनेक ठिकाणी कॅमेरेच सुरळीत नाहीत. त्यामुळे टोलनाक्यावरील कर्मचारी ‘फास्ट टॅग’ला हाताने स्कॅन करताना दिसून येताहेत. आताही नाक्यावर ‘फास्ट टॅगचे मार्ग जास्त नसल्यामुळे ‘फास्ट टॅग लागलेल्या वाहनांना काही टोलनाक्यांवर समस्या येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या