पुण्यात गोदामाला आग लागल्यामुळे कामगाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire-pic

शहरातील महात्मा फुले पेठेतील भंगार मालाच्या गोदामाला काल मध्यरात्री लागलेल्या आगीत कामगाराचा मृत्यू झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली. शिवकांत कुमार (वय 28, सध्या रा. आर. के. स्क्रॅप सेंटर, मासेआळी, महात्मा फुले पेठ, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.

महात्मा फुले पेठेत (गंज पेठ) आर. के. स्क्रॅप रोहित कुदाराम यांच्या मालकीचे दुकान आहे. दुकानाच्या मागील बाजूस भंगार मालाचे गोदाम आहे. दुकानात प्लस्टिकच्या वस्तू तसेच तेलाचे मोकळे डबे विकत घेतले जातात. काल मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास गोदामातून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला. शिवकांत गोदामात झोपलेला असताना आग लागल्याचे दिसून आल्यामुळे त्याने आरडा-ओरडा केला. त्यानंतर नागरिकांनी त्वरीत घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार भवानी पेठेतील मध्यवर्ती अग्निशमन केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. केंद्रप्रमुख प्रकाश गोरे, जवान राहुल नलावडे, सपकाळ, देवकुळे, कार्ले, शिर्के यांनी 10 मिनिटात आग आटोक्यात आणली. अग्निशमक दलाच्या जवानांनी गोदामाची पाहणी केली असता कामगार शिवकांत आगीत होरपळल्याचे दिसून आले. त्याला तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी खडक पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.