पुणे – सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुलासह काडतुसे जप्त

डेक्कन परिसरातील मुठा नदीपात्रालगत  स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन परिसरात थांबलेल्या एका सराईताला पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन काडतुसे असा 26 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.  शगुन जोगदंड (वय २५ , रा. ताडिवाला रस्ता ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

डेक्कन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब झरेकर पथकासह हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी  स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन परिसरात सराईत थांबल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शगुनला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याजवळ पिस्तुल आणि काडतुसे मिळून आली. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, डीबी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब झरेकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे, सचिन कदम, बाळासाहेब भांगले, सचिन चव्हाण, श्रीकांत लोंढे, ज्योतिराम मोरे,  शेखर शिंदे यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या