
कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी टोळीसह कुख्यात गुंड नीलेश घायवळवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार ही मोठी कारवाई करण्यात आली. घायवळसह एकूण 10 आरोपींचा यात समावेश असून, यातील पाचजणांना अटक करण्यात आली आहे.
मयूर पुंबरे, नीलेश घायवळ, मयंक व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक, आनंद चांदेलकर, रोहित आखाडे, अक्षय गोगावले, जयश वाघ, मुसाब शेख अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील पुंबरे, राऊत, चांदेलकर, फाटक आणि व्यास या पाचजणांना अटक करण्यात आली आहे.
मागील आठवडय़ात कोथरूड येथे मुठेश्वर मित्र मंडळासमोर सराईतांनी तरुणावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर दहा मिनिटांतच आणखी एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या दोन्ही घटनांप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील गोळीबाराच्या गुह्यात मोक्का कारवाई करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने यांनी अहवाल तयार करून पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्याकडे सादर केला होता.
घायवळ विरोधात लुक आऊट नोटीस
घायवळ हा सध्या विदेशात फरार असून, त्याच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर लुक आऊट नोटीस बजावली आहे.