गुलटेकडीत वाहनांची तोडफोड करून घराला आग लावण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहनांची तोडफोड करून गाडीच्या टायरला आग लावून नागरिकाच्या घरावर टाकून  घर जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुलटेकडीतील डायसप्लॉट परिसरात घडली. याप्रकरणी  स्वारगेट पोलिसांनी दोघा सराईतांना अटक केली आहे.

आदर्श उदबाळे, अनिकेत खंडाळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  उमेश राजम यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गुलटेकडी डायसप्लॉट परिसरात उमेश यांचे दुकान आहे. गुरूवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास तिघेजण त्यांच्या दुकानासमोर वाहनांची तोडफोड करीत होते. त्यामुळे उमेश यांनी आरोपींना गाड्या का फोडताय असे विचारले. त्याचा राग आल्यामुळे आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत घर पेटवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी  उमेश यांच्या गाडीच्या पुढच्या टायरला आग लावली. तसेच त्यांच्या अंगावर टायर टाकण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय दोन्ही आरोपींनी उमेश यांच्या दारावर पेटता टायर टाकून घर जाळण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आदलिंग पुढील तपास करत आहेत.