कवठे येमाईत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

46

सामना प्रतिनिधी। कवठे येमाई

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे शेळ्या-मेंढरांच्या तळावर आज रविवारी पहाटे बिबट्याने हल्ला करीत एका शेळीस ठार केले आहे. मेंढपाळ तुकाराम हिलाळ रा.मुंजाळवाडी यांनी या घटनेबाबत माहिती दिली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

मेंढपाळ तुकाराम हिलाळ व त्यांच्या पत्नी भीमाबाई हे आपली १०० मेंढरे व ११ शेळ्या सहा रानोरान फिरून त्यांचा ३ वर्षांपासून सांभाळ करीत आहेत. रविवारी पहाटे ३ च्या सुमारास ढगे माथ्याजवळील उघडे यांच्या शेतात शेळ्या,बकरांसह वास्तव्यास असताना एका बिबट्याने एका मोठ्या शेळीवर हल्ला करत तिला ठार केले. एका महिन्यापूर्वी हिलाळ यांनी ही शेळी २० हजार रुपयांना खरेदी केली होती. तिला १५ दिवसांची दोन लहान करडे देखील आहेत. बिबट्याने शेळीला ठार मारल्याने हि नवजात २ करडे पोरकी झाली आहेत. तर या घटनेने हिलाळ कुटुंब पूर्ण हादरून गेले आहे. ही घटना घडताच तुकाराम हिलाळ यांनी मोबाईलवरून जवळील इतर शेतकऱयांना माहिती दिली. त्यानंतर इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. बिबट्याच्या हल्ल्यानंतर जाळी तोडून रानोमाळ सैरावरा झालेली सर्व बकरे जमा करीत त्यांनी सकाळपर्यंत तेथे थांबून हिलाळ कुटुंबाला धीर दिला.

वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर शासन नियमानुसार योग्य ती नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याला नक्कीच दिली जाईल असे आश्वासन शिरूरचे वनाधिकारी तुषार ढमढेरे यांनी दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या