
खडकीतील रेजहील्स भागात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी फोडून पैसे चोरणार्याला खडकी पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.
जसराज उर्फ चंक्या वासुदेवन मंन्नु (23, रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. 27 जानेवारी रोजी खडकीतील रेंजहील्स भागात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी फोडल्याची घटना घडली होती. घटनेनंतर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. दरम्यान येथील एका गॅरेजमध्ये काम करणारा जसराज हा घटना घडल्यापासून गायब झाला होता. त्यामुळे त्याने चोरी केल्याचा संशय पोलिसांना होता. तेव्हापासून खडकी पोलीस जसराजच्या शोधात होते. या दरम्यान जसराज हा रेजहील्स भागात आल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम यांच्या पथकाला मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून जसराज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबूली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव मगदूम, तानाजी कांबळे, संदेश निकाळजे, उद्धव कलंदर, जहांगीर पठाण, सागर जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

































































