हॉटेल वेस्टेजमधून पालिकेने बनवला सीएनजी; दररोज 1300 किलो सीएनजीची निर्मिती

पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील हॉटेल वेस्टपासून दररोज एक हजार ३०० किलो सीएनजी तयार करत आहे. शहरातील शंभरपेक्षा अधिक वाहने हा सीएनजी वापरत आहेत. महापालिका एका खासगी संस्थेबरोबर सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प राबवत आहेत. आगामी काळात प्रकल्पाची क्षमता २५० टनापर्यंत वाढवून दररोज २० हजारपेक्षा अधिक किलो सीएनजी निर्मिती करण्याचा मानस आहे.

शहरातील दररोज सरासरी दीड हजार टन ओला व सुका कचरा मोशी कचरा डेपोत जमा केला जातो. या या कचऱ्यापासून वीज, कंपोस्ट खत, डिझेल, ऑइल, प्लॅस्टिकचा कच्चा माल, वाळू, पेव्हर ब्लॉक आदी तयार केले जात आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, खानावळ, कंपन्या व शैक्षणिक संस्थेतील कॅण्टीन, वसतिगृह, खाद्यपदार्थ स्टॉल आदी ठिकाणच्या शिल्लक अन्नपदार्थांपासून हॉटेल वेस्ट तयार होते. शहरात सुमारे चार हजार हॉटेल्स व रेस्टॉरंट आहेत. ते टाकाऊ अन्नपदार्थ वाहनांद्वारे मोशी कचरा डेपोत आणून ‘हॉटेल वेस्ट टू बायोगॅस’ या प्रकल्पात जमा केला जातो. हा ५० टन क्षमतेचा प्रकल्प आहे.

हॉटेल वेस्टवर प्रक्रिया करून सीएनजी वायू तयार केला जात आहे. शहरातून दररोज ३५ टन हॉटेल वेस्ट जमा केले जाते.त्यापासून एक हजार ३०० किलो सीएनजी तयार केला जात आहे. प्रक्रिया करून शिल्लक लगद्यापासून लिक्विड फॅटिलायझर आणि खत तयार होते. ओला कचरा बारीक करून पाण्याचे मिश्रण करून पेस्ट केली जाते. ते मिश्रण दुसऱ्या टाकीत साठवून बायोगॅस तयार होतो. त्यात ५५ टक्के मिथेन वायू असतो. तो वायू ९५ टक्के शुद्ध करून सीएनजी वायू तयार केला जातो. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाची परवाना मिळाल्याने नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून सीएनजी सरकारच्या एमएनजीएल कंपनीला ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.

आणखी दोन प्रकल्प
वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात हॉटेलची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे या बायोगॅस प्रकल्पात १०० टनांचे आणखी दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची एकूण क्षमता २५० टन करण्यात येईल. त्यामुळे दररोज २५० टन हॉटेल वेस्टपासून मोठ्या प्रमाणात सीएनजी इंधन तयार होणार आहे.

महापालिका एका खासगी संस्थेबरोबर पीपीपी तत्त्वावर प्रकल्प १५ वर्षांसाठी राबविला जात आहे. अनवी ‘डीएम ग्रीन एनर्जी ‘द्वारे शहरातील सर्व हॉटेलमधील हॉटेल वेस्ट जमा करून प्रकल्पात आणला जातो. तयार झालेला सीएनजी कंपनीकडून विकला जात आहे. एमएनजीएलला सीएनजी विकणारी पिंपरी-चिंचवड ही राज्यातील पहिली महापालिका आहे. या प्रकल्पामुळे शहरात निर्माण होणाऱ्या सर्व हॉटेल वेस्टची विल्हेवाट योग्य पध्दतीने लागत आहे.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता-१, पर्यावरण आणि अभियांत्रिकी विभाग, महापालिका.