पुण्यातील दुहेरी हत्याकांडातील पतीचा मृतदेह आढळला, हत्याकांडातील गूढ वाढले

पुण्यातील मायलेकराच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी  संशयाची सुई असलेल्या बेपत्ता पतीचा मृतदेह खडकवासला नजीक असलेल्या खानापूर गावाजवळ आढळला आहे. त्याच्याजवळ असलेल्या पिशवीत कागदपत्रामुळे ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, त्याचा मृतदेह आढळल्याने या हत्याकांडाचे गूढ वाढले आहे.

आबिद शेख वय 35 असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सात पथके रवाना करण्यात आली होती.  आयान शेख (वय 6) आणि आलिया शेख (वय 35) असे खून झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.

शेख कुटूंब मुळचे मध्य प्रदेशातील असून 2007 पासून नोकरीनिमीत्त पुण्यात राहत होते. काही दिवसांपुर्वी ते धानोरीतून चरोलीमध्ये रहायला गेले होते. आबिद शेख एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होते. मात्र, ऑटिझम असलेल्या  मुलाचा संभाळ करण्यासाठी त्यांनी अडीच वर्षापूर्वी नोकरी सोडली होती. मुलगा ऑटिझमग्रस्त असल्याचे लक्षात आल्यावर कुटूंब तणावात होते. मुलाला शिकवण्यासाठी घरी एक शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. आलिया शेख यांचे वडिल मध्य प्रदेशात वनाधिकारी होते, तर आबिद शेख याचे वडिल जिल्हा योजना नियोजन केंद्रात अधिकारी होते. त्याचा भाऊ कॅनडामध्ये स्थायिक आहे.

आबिदने 11 जूनला  गाडी भाड्याने घेतली होती. त्यानंतर तो   11 ते 14 जून पर्यंत सलग कुटूंबाला  घरातून बाहेर घेऊन जात होता. सकाळी फिरायला गेल्यावर संध्याकाळी कुटूंबासह पुन्हा घरी येत होता.  मात्र 14 जून रोजी आबिद कुटूंबाला घेऊन सासवड-दिवेघाट-बनेश्वर-बोपदेव घाट- दिवे घाटातून पुन्हा सासवडला गेला. तेथे त्याने रात्री साडेआठच्या सुमारास गाडीतच आलियाचा खून केल्याची शक्यता आहे. त्यानंतर आलियाचा मृतदेह सासवड पोलिसांना सापडला होता.  आदिबने   गाडी पुन्हा कात्रज- दत्तनगर चौक-कात्रज नवा बोगदा येथे नेली. तेथे मुलाचा खून करुन त्याचा मृतदेह टाकला असावा. यानंतर 15 जूनला पहाटे एक वाजता त्याने गाडी मार्केटयार्ड येथे सोडून स्वारगेटच्या दिशेने पायी चालत जाताना तो सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पोलिसांना गाडीमध्ये दोन लोखंडी  पाईप सापडले असून मुलाचे कपडे व खाण्याचे साहित्यही आढळले आहे. गाडीच्या मागच्या सीटवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. तसेच गाडीमध्ये तिघांव्यतिरीक्त आणखी कोणी नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे संशयाची सुई आबिदकडे  होती.  आता त्याचाच मृतदेह आढळल्याने या घटनेचे  गूढ आणखी वाढले आहे. दरम्यान शवविच्छेदनाच्या अहवालात आलियाला जबर मारहाण केल्याने आणि आयानचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या