Pune News – कोकणात सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, 20 विद्यार्थ्यांसह 5 शिक्षक जखमी

कोकणातून सहलीवरून परतत असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगाव येथे हा अपघात घडला. या अपघातात बसमधील 20 विद्यार्थी आणि 5 शिक्षक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मंचर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील सह्याद्री कॉलेजचे विद्यार्थी एकूण चार एसटी बसने कोकणात सहलीला गेले होते. सहलीवरून संगमनेरकडे परतत असताना अकोले आगाराच्या एसटीने एकलहरे येथे गतिरोधकाजवळ अचानक वेग कमी केला. यादरम्यान मागून भरधाव आलेली दुसरी एसटी पुढील बसला जोरात धडकली. या धडकेत मागील एसटीच्या पुढील भागाच्या सर्व काचा फुटल्या असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अपघाताच्या वेळी अनेक विद्यार्थी आणि शिक्षक झोपेत असल्याने अचानक झालेल्या धडकेने गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांचा आरडाओरडा ऐकून एकलहरे परिसरातील हॉटेल व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत आले आहे. सध्या सर्वांची प्रकृतीत स्थिर असून त्यांना सुरक्षितपणे संगमनेर येथे रवाना करण्यात आल्याचे मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.

दरम्यान अपघाताची माहिती कळताच मंचर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक मोहम्मद सय्यद आणि रुग्णवाहिका चालक अमित काटे यांनी तत्काळपणे दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून सर्व जखमींना मंचर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

भारती दळवी (57), रूपाली सुपेकर (49) गणेश गुंजाळ (53) संतोष थोरात (43) गणपत जोंधळे (54) अशी जखमी शिक्षकांची नावे आहेत. तर अजय पवार (18), प्रणव परदेशी (16), अनुष्का कोरडे (16), सार्थक अरगडे (17), संजना कचेरीया (17), अंकिता दिघे (17), गणराज बांगर (16), पूजा मुसळे (16), दिव्या अरगडे (16), भक्ती चितळे (16), श्वेता सूर्यवंशी (16), ईश्वरी कोकणे (16), श्वेता अभंग (17), ईश्वरी करपे (16), वर्षा राठोड (18), प्रीती खरात (16), पुनम शिंदे (16), प्रांशू तिवारी (16), राहुल तळपे (16) आणि समाधान कांदळकर अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.