
शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. सरकारच्या या आश्वासनाबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच शेतकऱ्यांनी पण वेळेत कर्ज फेडण्याची सवय लावावी, सारखं फुकटात कसं चालणार? असे वादग्रस्त वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
बारामतीमधील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, तुम्हाला बँकेने शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यावर ते वेळेत फेडायची सवय लावा ना. सारखंच फुकटात, अन् सारखंच माफ कसं व्हायचं. असं नाही चालत.
निवडून यायचं म्हणून आश्वासन दिलं!
एकदा शरद पवारांनी कर्जमाफी दिली, एकदा देवेंद्र फडणवीस यांनी, एकदा उद्धव ठाकरे आणि आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा कर्जमाफी दिली. आता पुन्हा महायुतीत असताना निवडून यायचं होतं म्हणून आम्ही माफ करू असं सांगितलं. लोक काय म्हणतात, तुम्ही कर्जमाफी बोलला होता. शब्द दिला त्याला आज काही हजार कोटी रुपये लागणार आहेत. आजही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दिलेली रक्कम लोक भरायला तयार नाहीत, असे अजित पवार म्हणाले.
































































