क्षुल्लक वादातून वर्गमित्रानेच बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कोयत्याने वार करुन हत्या केल्याची धक्कदायक घटना पुण्यात घडली आहे. बारामतीतील तुळजाराम चतुरचंद कॉलेजमध्ये सोमवारी ही घटना घडली. पीडित आणि आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे पुण्यासह राज्यात एकच खळबल उडाली आहे.
तुळजाराम चतुरचंद कॉलेजमध्ये बारावीत शिकणाऱ्या दोन मित्रांमध्ये सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास काही कारणातून वाद झाला. या रागातून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कोयत्याने हल्ला केला. जखमी अवस्थेत पीडित मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हल्ल्यात आरोपीसोबत आणखी एक वर्गमित्र सामील होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांना ताब्यात घेतले. दोघांमध्ये नक्की कोणत्या कारणातून वाद झाला, याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.
बारामती येथील एका महाविद्यालयात एका तरुणाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. राज्यातील कायदा व्यवस्थेचा आलेख दिवसेंदिवस ढासळत चाललेला असून गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. दिवसाढवळ्या कुणीही तलवार, कोयता, गावठी पिस्तुल घेऊन येतो आणि खून करतो…
— Supriya Sule (@supriya_sule) September 30, 2024
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
या घटनेनंतर बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “बारामती महाविद्यालयात भरदिवसा एका तरुणाची हत्या धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे आणि गुन्हेगारांना कोणतीही भीती उरलेली नाही,” असे सुप्रिया सुळे यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.
“लोक तलवार, कोयता किंवा पिस्तुल घेऊन फिरण्याच्या घटना वाढल्या आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपयशामुळे महाराष्ट्रात गुंडराज निर्माण झाले असून, आमच्या राज्याला अनेक वर्षे मागे नेले आहेत”, असेही सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या.