अतुल्य कॅलेक्सकडून 400 ग्राहकांची फसवणूक, 7 वर्षांनंतरही फ्लॅटचा ताबा नाही; बँकांचे हप्ते मात्र सुरूच

‘घराचा ताबा मिळेपर्यंत हप्ता नाही’, अशी जाहिरात करीत दोघा बांधकाम व्यावसायिकांनी गोरगरीब नागरिकांना वडगाव मावळातील जांभूळ कान्हे फाटा परिसरातील अतुल्य कॅलेक्स प्रकल्पात फ्लॅट बुक करण्यास भाग पाडले. त्यानंतर बँकेने मंजूर केलेले कर्ज तसेच पंतप्रधान आवास योजनेची रक्कम असे 28 कोटी रुपये स्वतःकडे वर्ग करून घेतले. मात्र, 2018 साली सुरू केलेल्या बांधकाम प्रकल्पात अद्यापही घरे न देता 400 पेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध कठोर कारवाई करून आम्हाला न्याय देण्याची मागणी संबंधितांनी महारेराकडे केली आहे.

बांधकाम व्यावसायिक गौरव सुनील सोमाणी (रा. बिबवेवाडी) आणि नितीन श्रीकिसन जाजू (रा. पुणे) अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध मे 2024 मध्ये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फसवणुकीसह मोफाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार सोमाणीला 7 डिसेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही दोघा व्यावसायिकांनी प्रकल्प पूर्ण न करता तक्रारदारांना वेळेत फ्लॅट दिले नाहीत.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या दरात अतुल्य कॅलेक्स स्पेसेस या गृहप्रकल्पाचे बिल्डर गौरव सोमाणी आणि नितीन जाजू यांनी काम हाती घेतले होते. 2018 मध्ये जांभूळ कान्हे फाटा गावात गटक्रमांक 405 मध्ये प्रकल्पाची सुरूवात झाली.

‘नो इएमआय टिल पझेशन’ अशी पेपरमध्ये जाहिरात करीत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना घरे खरेदीसाठी आकर्षित केले. त्यानुसार 400 पेक्षा जास्त नागरिकांनी बुकिंग करीत राष्ट्रीयकृत बँकांकडून गृहकर्ज घेतले. सद्यस्थितीत 6 इमारतींचे बांधकाम अर्धवट असून, तीन इमारती प्रस्तावित आहेत. सोमाणी आणि जाजू यांनी पंतप्रधान आवास योजनेचेही पैसे घेत फसवणूक केल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे. दरम्यान, 2020 मध्ये कोरोना कालावधीतही ग्राहकांनी बँकेचे हप्ते वेळेवर जमा केले. मात्र, व्यावसायिकांनी जुलै 2025 पर्यंत इमारतींचे बांधकाम पूर्ण केले नाही.

तक्रारदारांनी 23 मे 2024 रोजी मावळ पोलीस ठाण्यात धाव घेत सोमाणी आणि जाजू यांच्याविरूद्ध फसवणुकीसह मोफातंर्गत गुन्हा दाखल केला होता. यामध्ये सोमाणीला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये तक्रारदार आणि बिल्डर यांच्यात बैठक झाली. त्यानुसार सोमाणीने तक्रारदारांना पेनल्टी देण्याचे कबुल केले होते. मात्र, शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी काहीही केले नसल्याचे संबंधितांनी तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, फ्लॅटसाठी मंजूर झालेली रक्कम आणि पंतप्रधान आवास अंतर्गत सबसिडीची रक्कमही बिल्डरने वसूल केली आहे. मात्र, ७ वर्षाहून अधिक काळ लोटल्यांनतरही घरे मिळाली नाहीत. दरमहा आम्हाला बँकेचा हप्ता जमा करावा लागत आहे. घराचा ताबा मिळाल्यानंतर हप्ते सुरू करण्याची मागणी संबंधितांनी वडगाव मावळ तहसीलदारांकडे केली आहे.

रिक्षावाले, भाजी विक्रेत्यांच्या स्वप्नातल्या घराला तडे

हक्काचे घर मिळविण्यासाठी अतुल्य कॅलेक्समध्ये सुरक्षारक्षक, रिक्षावाले, भाजी विक्रेते, चहाविक्रेता, फळविक्रेत्यांनी रक्कम गुंतविली आहे. ४०० फ्लॅटचे काम अर्धवट असल्यामुळे या गुंतवणूकधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे दोन्ही बांधकाम व्यावसायिकांकडून सर्वसामान्यांना घरे न देता त्यांची हेळसांड केल्याचे दिसून आले. त्यामुळे महारेरासह संबंधित बिल्डरांविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे.

बँकेकडून 18 कोटी 2 लाख 61 हजारांची कब्जा नोटीस

अतुल्य कॅलेक्स हा प्रकल्प 2017 मध्ये सुरू झाला असून, महारेराने प्रकल्पाला वाढीव मुदत दिली आहे. तरीही अजून बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे 200 पेक्षा जास्त ग्राहकांनी नोव्हेंबर 2024 पासून महारेराकडे नुकसान भरपाईसाठीची तक्रार केली आहे. महारेराने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, सर्व सोयीयुक्त घरे आम्हाला बांधून द्यावीत, बिल्डर सोमाणी यांना सक्तीचा आदेश किंवा दंड देण्याचा आदेश देण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. दरम्यान, सप्टेंबर 2023 मध्ये स्टेट बँक ऑफ मुंबई शाखेने 18 कोटी 2 लाख 61 हजार 590 रुपयांची थकबाकी प्रकरणात सोमाणी व जाजू यांना बँकेने कब्जा नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांकडूनही फॉरेन्सिक ऑडिटनंतर चार्जशीट पाठविण्यासंदर्भात टाळाटाळीची भूमिका घेतली जात आहे. या प्रकरणात आम्हाला न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.