
यवत येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण होऊन तोडफोड आणि जाळपोळीची घटना घडली होती. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले होते. त्यामुळे गावची बाजारपेठ पाच दिवस बंद होती. अखेर यवतमधील जमावबंदीचे आदेश शिथिल करून आज सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यामुळे पाचव्या दिवशी बाजारपेठ सुरू झाली होती. त्यामुळे व्यापारीवर्गाला आणि नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, सकाळी 11 वाजल्यापासून पुन्हा बाजारपेठ बंद करण्यात आली.
यवत पोलिसांनी आत्तापर्यंत 19 जणांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. जमावबंदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेचे वातावरण आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्थेसाठी यवत गावात पोलिसांचा बंदोबस्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत दररोज पाच तास जमावबंदी शिथिल असणार आहे. यवत येथील वातावरण शांत होऊन पूर्ववत बाजारपेठ सुरू होण्याची आशा व्यापारीवर्गाने व्यक्त केली आहे.
कोणीही आपले फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप वगैरे सोशल मीडियावर कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट्स, बॅनर्स, फोटो, टीका-टिप्पणी, मजकूर आदी पोस्ट करू नयेत. एखादी वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर आल्यास ती तत्काळ डिलीट करावी. पुढे फॉरवर्ड करू नये. त्याबाबत पोलीस ठाण्याला तत्काळ कळवावे. एखाद्या आक्षेपार्ह पोस्टमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्याअन्वये योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल. तसेच ग्रुप अॅडमिनलाही त्यात जबाबदार घरण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिला आहे.
सोशल मीडियाचा वापर करताना सर्वांनी सामाजिक सलोखा व सार्वजनिक शांतता अबाधित राहील याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक देशमुख यांनी केले आहे.