शहरात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांवरून उच्चशिक्षित महिलांना लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले आहे. मगरपट्टा सिटीतील एका आयटी अभियंता महिलेला सायबर चोरट्यांनी साडेतीन लाखांचा गंडा घातला असून, याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत मगरपट्टा सिटी येथे राहणाऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. 22 जून ते 15 सप्टेंबर या दरम्यानच्या काळात ऑनलाइन पद्धतीने ही घटना घडली आहे.
फिर्यादी महिल्या या एका आयटी कंपनीत अभियंता आहेत. सायबर चोरट्याने त्यांना संपर्क करून आधी डीएचएल या कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. यानंतर मुंबई पोलीस आणि सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगून ‘तुमच्या नावाने मुंबईते शांघाई पार्सल पाठविले जात असून, त्यात मोठ्या प्रमाणात एटीएम कार्ड, एक लॅपटॉप, 4 किलो कपडे, ड्रग्ज सापडले असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या आधारकार्ड नंबरवर मनी लॉण्डरिंग, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे तुम्हाला अटक केली जाईल,’ असे सांगून त्यांना भीती घातली. त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरील पैसे सरकारी सुरक्षा खात्यावर पाठवून तपासायचे असल्याचे सांगून महिलेला वेळोवेळी 3 कोटी 56 लाख 75 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. पोलीस निरीक्षक यशवंत निकम पुढील तपास करीत आहेत.
सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक
सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला विविध धमक्या देऊन त्यांच्याकडून 27 लाख रुपये ऑनलाइनरीत्या वर्ग करून घेत फसवणूक केली. ही घटना 6 ते 9 जुलै या कालावधीत पानमळा परिसरात घडली. याप्रकरणी 67 वर्षीय नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदाराला सायबर चोरट्यांनी फोन करून टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियातून बोलत असल्याची बतावणी केली. तुम्ही आधारकार्ड व सिमकार्डचा वापर डार्क वेबसाठी केल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराला व्हिडीओ कॉल करून मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याची बतावणी करून तुम्ही पिस्तूल आणि ड्रग्ज विकत घेतल्याची तक्रार असल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना बँक खाते क्रमांक देऊन त्यावर रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने त्यांच्या बँक खात्यात २७ लाख रुपये वर्ग केले. पोलीस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.