मुळा-मुठाची वहनक्षमता घटल्याने वाढला पुराचा धोका! जलसंपदा विभागाच्या माहितीवरून पर्यावरणप्रेमींचा दावा

जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीतून पुण्यातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांची वहनक्षमता कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. मुळा-मुठा नद्यांच्या पुरापासून पुण्याला निर्माण होणारा धोका हा २० ते ३० टक्क्यांनी वाढला आहे, असा दावा पर्यावरणप्रेमींनी केला असून, नदींची वहनक्षमता वाढवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

मुळा-मुठा नद्यांची वहनक्षमता कमी झाली आहे. पुराचा इशारा देणाऱ्या निळ्या रेषेच्या पातळीवर पाण्याचा प्रवाह किती होता, याची आकडेवारी त्यांनी सादर केली. मुळा-मुठा नद्यांच्या पुरापासून पुण्याला निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती महत्त्वाची ठरणार असल्याचे सारंग यादवाडकर, विवेक वेलणकर, पुष्कर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जलसंपदा विभागाने माहिती अधिकारात दिलेल्या माहीतीच्या आधारे यादवाडकर यांनी मुळा-मुठा नद्यांची वहनक्षमता कमी झाल्याचा दावा केला. जलसंपदा विभागाने २०११ साली मुळा-मुठाची पुराचा इशारा देणारी निळी पूररेषा आखली होती. त्यावेळी एक लाख १८ हजार क्युसेक प्रवाहाला बंडगार्डन बंधाऱ्याजवळ ही निळी पूररेषा ५४२.४५ मीटर पातळी गृहीत धरली गेली. ही पातळी न ओलांडता पाण्याचा प्रवाह वाहून गेला पाहिजे. गेल्या वर्षी २५ जुलै रोजी मुळा-मुठा नद्यांना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर आला होता. तेव्हा बंडगार्डन येथे पाण्याचा प्रवाह ६९ हजार १११ क्युसेक इतका होता, तेव्हा या प्रवाहाने ५४२.६० मीटरची पातळी गाठली होती. याच दिवशी सायंकाळी ८८ हजार ८८८ क्युसेक इतका प्रवाह असताना तो ५४३.४० मीटर पातळीला पोहोचला होता.

या वर्षी बंडगार्डन बंधाऱ्याजवळ २० ऑगस्ट रोजी पाण्याचा प्रवाह ७१ हजार ४०८ क्युसेक इतका होता, तेव्हा प्रवाह ५४२.७० मीटर पातळीला पोहोचला होता. या आकडेवारीवरून पुण्यातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांची वहनक्षमता कमी झाल्याचे दिसते. यामध्ये पुण्याच्या क्षेत्रातील ओढे-नाले यांचे पाणी मुळा-मुठा नद्यांना येऊन मिळत असल्याने त्याचाही या प्रवाहात समावेश आहे. नदीची वहनक्षमता वाढविणे गरजेचे असून, त्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. त्यांनी पुराचा धोका कमी करण्यासाठी शास्त्रशुद्ध आणि कणखर पावले उचलण्याची गरज पर्यावरणप्रेमी यादवाडकर, वेलणकर, कुलकर्णी दावा यांनी व्यक्त केली.

पर्यावरणप्रेमी सारंग यादवडकर म्हणाले, ‘खडकवासला धरणसाखळीतील सर्व धरणे ही पूर्ण क्षमतेने भरली आहेत. सप्टेंबर महिना जायचा आहे, तसेच परतीचा पाऊसही बाकी आहे. धरणांच्या पाणलोटक्षेत्रात धो-धो पाऊस झाला तर धरणातून मोठा विसर्ग सोडावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुराचा धोका कायम राहीला आहे.’