कोरोनामुळे जेलबाहेर आला अन चोरीसाठी तरुणाचा खून केला, सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने केली अटक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातून जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराने चोरीच्या उद्देशाने स्वारगेट परिसरात एकाचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याच गुन्हेगाराने यापूर्वी केलेले दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहेत. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी ही माहिती दिली.

ऋषिकेश जीवराज कामठे (वय -34, रा. लोकमान्य कॉलनी कोथरूड) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. नागेश दगडू गुंड (वय -37, रा. केरुळ, ता. तुळजापूर ) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश 3 ऑगस्टला तुळजापूर येथून स्वारगेटमधील जेधे चौकात रात्री साडेअकरा वाजता उतरला होता. मित्र कमलाकर घोडके त्याला घेऊन जाण्यासाठी येत असल्याने तो वाट पाहत उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने नागेशला पैसे आणि ऐवज काढुन दे अशी मागणी केली. त्यास नागेशने विरोध करून प्रतिकार केल्याने सराईत ऋषिकेशने त्याच्या पायावर वार करून खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल काढून घेत पळून गेला. त्यानंतर तेथे आलेल्या नागेशच्या मित्रांसह पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक गुन्ह्याचा तपास करीत होते. त्यावेळी हा गुन्हा ऋषिकेश कामठेने केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल कोथरूड मधील जुना कचरा डेपो येथून कामठेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने स्वारगेट येथील खुनाचा गुन्हा केल्याचे कबुल केले.

ऋषिकेश कामठे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. लॉकडाउन घोषीत झाल्यानंतर मे 2020 मध्ये त्याची येरवडा कारागृहातुन तात्पुरत्या जामिनावर बाहेर सुटका झाली होती. त्यानंतर त्याने स्वारगेट चौकातील खून केला आणि 15 दिवसांपूर्वी येरवडा पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, संतोष क्षीरसागर यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या