Breaking पुणे पोलीस आयुक्तांचे ट्विटर अकाऊंट हॅक?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

शहरात कोरोनाचा कहर सुरू असतानाच पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांचे ट्विटर अकाऊंट सायबर चोरट्यांनी हॅक केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात पुणे पोलीस यांच्या ट्विटर अकाऊंटवरून तशी माहिती देण्यात आली असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या मेसेजला उत्तर न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर पुणे पोलीस आयुक्तांचे ट्विटर हॅक झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने सारवासारव करीत ट्विटर हँडलरकडून चुकून ट्विट झाल्याचे सांगितले आहे.

पुणे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम सोशल मीडियावर सातत्याने कार्यरत असतात. प्रामुख्याने त्यांच्याकडून दररोज सीपी पुणे सिटी या ट्विटर अकाऊंटवर नागरिकांसाठी माहिती दिली जाते. अनेक नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्याकडून प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्याकडून पुणे पोलिसांचे कौतुक केले जाते. मागील दीड महिन्यापासून कोरोनाच्या विळख्यातही पोलीस आयुक्तांनी अनेक ट्विट करून नागरिकांना मदत केली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पुणे पोलीस यांच्या ट्विटर अकाऊंटवर सीपी पुणे सिटी यांच्या ट्विटर संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. शहरातील नागरिकांनी सीपी पुणे सिटी यांच्या ट्विटर मेजेस करू नये, सायबर पोलीस यासंदर्भात माहिती घेत आहेत. असे ट्विट केले. त्यामुळे नागरिकांमध्ये पुणे पोलीस आयुक्तांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर नागरिकांच्या विविध तक्रारी आणि दूर होण्यासाठी पोलिसांनी ट्विटर हँडलरच्या नावाने सारवासारव करण्यास सुरुवात केली. शहरात एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि पोलीस आयुक्तांचे ट्विटर हँडल हॅक झाल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

हे प्रश्न अनुत्तरित

शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या ट्विटर अकाऊंटवरून चुकून झालेले ट्विट तातडीने डिलिट करता आले असते. मात्र, पुणे पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात नागरीकांना माहिती देऊन सिपी पुणे सिटी यांना मेसेज न करण्याचे आवाहन का केले. यामुळे सिपी पुणे यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले असल्याची माहिती सायबर जाणकारांनी दिली आहे.

कोट- माननीय पुणे पोलीस आयुक्त यांचे ट्विटर हँडल करणाऱ्या व्यक्तीकडून चुकून काही ट्विट झाले होते. त्यानंतर चूक लक्षात आल्यानंतर हे ट्विट डिलिट करण्यात आले आहे. सिपी पुणे सिटी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले नसून नागरिकांनी चिंता करू नये.

– संभाजी कदम, सायबर पोलिस उपायुक्त, पुणे