..चाकच फिरली नाहीतर पोट भरायची कशी? लॉकडाऊन संपण्याची…वाट बघतोय रिक्षावाला

619
प्रातिनिधिक फोटो

कोरोना’मुळे पुकारण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चा सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. मागील दोन महिन्यांपासून अत्यावश्‍यक सेवा वगळता शहरातील प्रवासी सेवा बंद आहे. परिणामी दिवसभर मेहनत करून रिक्षा व्यवसायावरच संसाराचा गाडा हाकणारे हजारो कुटुंब संकटात सापडले आहेत. ‘रिक्षाचे मीटर’च बंद असल्याने संसाराचा गाडा हाकायचा कशा अशा चिंतेत रिक्षाचालक अडकले आहेत. रिक्षाची चाकचं फिरली नाहीतर घरच्यांची पोट कशी भरायची, अशी चिंता त्यांना सतावत आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांपासून राज्यासह देशभरात लाॅकडाऊन पुकारण्यात आलेला आहे. यामुळे बहूतांश कामकाज ठप्प झाले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून २५ मार्चपासून राज्यभरातील प्रवासी वाहतूक देखील बंद ठेवण्यात आली. याचा मोठा फटका रिक्षाचालकांना बसला आहे. आजघडीला शहर परिसरात ५० हजारांवर अधिक रिक्षा आहेत. मात्र, लाॅकडाऊनमुळे या सर्व रिक्षा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. रिक्षा व्यवसाय म्हणजे दिवसभर काम केल्यानंतरच घरात चूल पेटते असे चित्र आहे. यातच स्वतःच्या मालकीची रिक्षा चालवणाऱ्यांची संख्या शहरात कमी आहे. अनेकजण भाड्याने रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. मुलाच्या शिक्षणापासून ते घरखर्च भागविणे अशी कसरत त्यांना करावी लागते. अनेकांनी बॅक, पतसंस्थेकडून कर्ज काढून रिक्षा घेतलेल्या आहेत. अशा चालकांना आता हप्ते कसे फेडायचे हा प्रश्न पडला आहे. मागील दोन महीन्यापासून उत्पन्नच मिळत नसल्याने अनेक चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

…भाजीपाला विकण्याची वेळ
दोन महिन्यांपासून रिक्षा जागेवर उभी आहे. लाॅकडाऊन वाढतच चालला आहे. यामुळे किती दिवस व्यवसाय बंद ठेवणार. रिक्षा बाहेर काढली तरी प्रवासीच मिळत नाहीत. म्हणून आता रिक्षातून भाजीपाला विकण्यास सुरवात केली आहे. घराशेजारील परिसरात रोज सकाळी भाजी विकून मिळणाऱ्या पैशातून घर सांभाळत आहे. लवकर रिक्षा व्यवसाय सुरू झाला पाहीजे- सुनिल इंगूळकर, रिक्षाचालक

…जगायच कसं हाच प्रश्न
रिक्षा चालवला तरच मी घर चालवू शकते. मागील दोन महीन्यापासून व्यवसाय बंद आहे. यामुळे जगायच कसं? हा प्रश्न पडला आहे. सध्या इतरही काम मिळत नाही. घर चालवायला पैसे नाहीत. यामुळे आता रिक्षा विकण्याची वेळ माझ्यावर आली आहे- पूनम गायकवाड, रिक्षा चालक

रिक्षा व्यवसाय बंद असल्याने चालकांसमोर अर्थिक संकट निर्माण झाले आहे. आम्ही संघटनेच्यावतीने सातशे – आठशे चालकांना रेशन किटचे वाटप केले. मात्र, त्याला मर्यादा येत आहेत. यामुळे लवकरात लवकर रिक्षा व्यवसाय सुरू झाला पाहीजे- आबा बाबर, शिवनेरी रिक्षा संघटना.

…अत्यावश्यक सेवेसाठी ३५० रिक्षा
शहरातील रिक्षा वाहतूक बंद असली तरी अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी वाहतूक पोलीसांच्या मदतीने सीटी ग्लाईड या संस्थे तर्फे ३५० रिक्षा शहरात सुरू ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी ९८५९१९८५९१ या नंबरवर व्हाॅट्सअॅप केल्यास त्यांना सेवा दिली जाते, असे संस्थेचे समन्वयक राहुल शितोळे यांनी सांगितले. मात्र, ही सेवा केवळ अत्यावश्यक कारणासाठीच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या