जमीन खरेदीच्या आमिषाने व्यवसायिकाला 18 लाखांचा गंडा, माहिती अधिकार कार्यकर्त्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा

वानवडीतील एका व्यावसायिकाशी जमीन विक्रीचा व्यवहार करून त्यांच्याकडून 18 लाख रुपये घेत जमीन दुसऱ्यांना विकून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह सातजणांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बऱ्हाटेविरुद्ध दाखल झालेला हा आठवा गुन्हा आहे.

विनोद गोकूळ ढोणे, सचिन श्रीरंग ढोणे, सुनील पांडुरंग खेडेकर, नंदा लालदास जोरी, राकेश लालदास जोरी, राजश्री दीपक चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उत्तम केदारी (वय -70 , रा. केदारी रेसिडेन्सी, वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम केदारी हे व्यावसायिक असून त्यांची पुरंदरमधील गराडे येथे जमीन आहे. त्यानिमित्त गावी येणे-जाणे होत असतानाच त्यांची विनोद ढोणे व सचिन ढोणेशी ओळख झाली. त्यांनी सात एकर जमीन विकायची असल्याचे केदारी यांना सांगितले. त्यानुसार केदारी व त्यांच्या बंधूंनी 1 कोटी 64 लाख रुपयांना जमीन खरेदी करण्याचे निश्चित झाले. त्यानंतर केदारी आणि त्यांच्या तीन भावांनी ढोणे बंधूला 10 लाख रुपये धनादेशाद्वारे दिले.

काही दिवसांनी ढोणे बंधूंनी घरात लग्नकार्य असल्यामुळे आणखी पैसे देण्याची मागणी केली. तेव्हा केदारी यांनी पुन्हा 8 लाख रुपयांचा धनादेश देत एकूण 18 लाख रुपये दिले. त्यानंतर केदारी यांनी ढोणेकडे जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी संबंधित जमीन परस्पर विक्री केल्याचे केदारी यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर केदारी यांनी ढोणे बंधूकडे 18 लाखांची मागणी केली. त्यावेळी प्रकरणात मध्यस्थी करीत माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटेसह इतरांनी त्यांना दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या