
>> पंजाबराव मोरे
नवरात्रोत्सवाच्या पर्वात होणाऱ्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात आजवर 55 नामवंत महिला कीर्तनकारांनी कीर्तन सेवा दिली आहे. त्यांच्या सेवाकार्याची ही माहिती.
महिला कीर्तनकार ही संकल्पना नवीन नसली तरी त्यांच्या कार्याबाबत आजही तितकेच कुतूहल आणि आदर राखला जातो. महिला कीर्तनकारांचे महोत्सव यासाठी महत्त्वाचे योगदान देतात. छत्रपती संभाजीनगर जिह्यातील खंडाळा येथे आयोजित केला जाणारा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव प्रसिद्ध आहे. कला महोत्सव, नाटय़ महोत्सव यातून समाजातील सांस्कृतिक साक्षरता वाढण्यास मदत होते. यात महत्त्वाचा सहभाग ठरतो आध्यात्मिक उपक्रमांचा. खंडाळा येथील मुरली थोरात ‘जगदंबा महिला मंडळा’च्या सहकार्याने महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवतात. यातीलच एक म्हणजे राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सव. 2020 पासून सुरू झालेल्या या महोत्सवाला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद लाभतो. सध्या या महोत्सवाचे सहावे वर्ष असून पहिल्या वर्षी अवघ्या सहा महिन्यांत दोन राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव भरवले गेले. नवरात्रोत्सवाच्या पर्वात होणाऱया या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात आजवर 55 नामवंत महिला कीर्तनकारांनी कीर्तन सेवा दिली आहे. कोरोना काळातही या महोत्सवात खंड पडला नाही. पहिल्या वर्षापासून कीर्तनकार ह. भ. प. सुवर्णाताई जमधडे, नंतर संगमनेरच्या ह.भ.प. जयश्रीताई तिकांडे, ह. भ. प. सत्यभामा भुजंग यांच्या नेतृत्वाखाली हे कीर्तन महोत्सव पार पडत आहेत. यात विशेष कौतुक करायला हवे ते कीर्तन सेवा देणाऱया भगिनींचे. आपले दैनंदिन काम सांभाळत कीर्तनाच्या माध्यमातून करत असलेली समाज प्रबोधनाची सेवा आजच्या घडीला अत्यंत मोलाची आहे. सध्याच्या घडीला कीर्तन परंपरा कायम ठेवणारी मंडळे, संस्था कमी होत असताना या सेवेत झोकून देत अविरत साधना करणे सोपे नाही.
जगदंबा महिला मंडळाच्या छाया थोरात, रंजना वाघचौरे, भारती थोरात, मनीषा गायकवाड, कल्याणी पवार, वंदना पवार, शोभा गायकवाड, सविता पवार, शैला काळे आणि कल्पना गाडेकर या महिलांनी हा महोत्सव यशस्वी केला आहे. सामाजिक उपक्रम आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या व्यक्ती व कीर्तन परंपरा कायम ठेवणारे हे काम मोलाचे आहे.



























































