
ज्येष्ठ विचारवंत आणि रूईया महाविद्यालयातील माजी मराठी विभागप्रमुख प्राध्यापक पुष्पा भावे यांचे शनिवारी रात्री 12.20 वाजता कॉलनी नर्सिंग होम येथे निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा, प्रभावी वक्तृत्व आणि त्याला सुसंगत कृतीची जोड देणाऱ्या समाजवादी नेत्या आणि मराठीतील विचारवंत लेखिका अशी त्यांची ओळख होती. त्या मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थीप्रिय शिक्षका होत्या.
विद्यार्थी दशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या. स्त्रीवादी चळवळींची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या सुरुवातीपासून होत्या. डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक होत्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी असत. त्यांचे पती मराठी साहित्यिक, वक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार प्रा. अनंत भावे आहेत.
पुष्पा भावे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक पुष्पा भावे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्राध्यापक पुष्पा भावे यांचे निधन ही महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची, सुधारणावादी विचारांची, दुर्बल-वंचित-उपेक्षित घटकांच्या हक्काच्या लढ्याची, महिला सक्षमीकरणाच्या चळवळीची मोठी हानी आहे. व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारा, सर्वसामान्यांवरच्या अन्यायाविरुद्ध उठणारा हक्काचा आवाज आज शांत झाला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.






























































