जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा – सिंधूचा सलग दुसरा विजय

हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळविला. बुधवारी झालेल्या महिला एकेरीच्या लढतीत मलेशियाच्या लेत्शाना कारूपथेवान हिला सरळ गेममध्ये पराभूत केले.

पहिल्या गेममध्ये एक वेळेस मलेशियन खेळाडू १८-१३ ने आघाडीवर होती. मात्र, सिंधूने जोरदार पुनरागमन करत २१-१९ ने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये तिने सुरुवातीपासूनच नियंत्रण ठेवले. मध्यंतरापर्यंत ती ११-६ ने पुढे होती आणि शेवटी २१-१५ ने गेम जिंकत सामना आपल्या नावावर केला.

ध्रुव-तनिषा जोडी विजयी

हिंदुस्थानच्या ध्रुव कपिला आणि तनिषा कृष्टो या मिश्र दुहेरीच्या जोडीनेही अंतिम ३२ मध्ये विजय मिळवला. त्यांनी आयर्लंडच्या जोशुआ मॅगी आणि मौया रायन या जोडीला २१-११, २१-१६ असा सरळ गेममध्ये पराभव केला. आता अंतिम १६ मध्ये गुरुवारी त्यांचा सामना हाँगकाँगच्या तांग चुन मिन आणि से यिंग सुट यांच्याशी होणार आहे.