‘पीडब्ल्यूडी’ अभियंत्याचे कॅशकांड, निधी मंजुरीसाठी कंत्राटदारांकडून टक्केवारी मनसेचा आरोप

सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचाराचे प्रमाण झपाटय़ाने दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी कामासाठी निश्चित रक्कम ठरलेली असायची आणि त्या रकमेतून ठरावीक टक्केवारी घेतली जायची. मात्र, आता परिस्थिती बदलली असून शासनाकडून निधी मंजुरीसाठी रोख रकमेत कंत्राटदाराकडून टक्केवारी उकळली जात असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. हाफकिन शाखेतील ‘पीडब्ल्यूडी’ अभियंत्याच्या कॅशकांडचा व्हिडीओ मनसेकडून व्हायरल करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड एक व्हिडीओ पोस्ट करत मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केला आहे. यामध्ये पीडब्ल्यूडीचा हाफकिन शाखा अभियंता पैसे घेताना दिसत आहे. या खात्यासाठी शासनाकडून जो निधी आणला जातो, त्या निधीची टक्केवारी आधीच कंत्राटदारांकडून गोळा केली जाते. लेटर ऑफ क्रेडिटच्या नावाखाली 2 लाख 80 हजार कंत्राटदाराकडून घेण्यात आल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.