पीवायसी-टूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धा – ग्रिफिन्स-हॉक्स विजेतेपदासाठी भिडणार

ग्रिफिन्स, हॉक्स या संघांनी अनुक्रमे रेव्हन्स, स्वान्स या संघांचा पराभव करून अकराव्या पीवायसी-टूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता उभय संघ विजेतेपदासाठी भिडणार आहेत.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत वरिष्ठ गटाच्या पहिल्या उपांत्य लढतीत ग्रिफिन्स संघाने स्वान्स संघाचा ४-० असा एकतर्फी पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. ग्रिफिन्स संघाकडून अनिकेत शिंदे, सोहम जोशी, अविनाश दोशी, बिपीन देव, आकाश सूर्यवंशी, आरुषी पांडे, निखिल भाटे, नीलेश केळकर यांनी अफलातून खेळी केली. दुसऱ्या उपांत्य लढतीत हेमंत पाळंदे, पराग चोपडा, चिन्मय जोशी, राधिका इंगळहळीकर, अक्षय ओक, सिद्धांत खिंवसरा, अभिषेक ताम्हाणे, यश मेहेंदळे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर हॉक्स संघाने रेव्हन्सचा ४-३ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

अखेरच्या साखळी लढतीत रॉकेट्स संघाने बॉबकॅट्स संघावर ६-१ असा सहज विजय मिळवला. रॉकेट्स संघाकडून कृष्णनील गोरे, निखिल चितळे, प्रीती सप्रे, तुषार मेंगळे, सारा मेंगळे, अतुल ठोंबरे, क्षितीज कोतवाल, रोहन पै., अनिरुद्ध आपटे, जनक वाकणकर यांनी सुरेख कामगिरी केली. स्पिअर्स संघाने सनबर्ड्स संघाचा ५-२ असा पराभव केला. विजयी संघाकडून ईशान लागू, हर्षद जोगाईकर, अमोल मेहेंदळे, विश्वास मोकाशी, ईशा साठे, अनिरुद्ध रांजेकर, गोपिका किंजवडेकर, ईशान पारेख, आदित्य जितकर, पृथ्वी शहा यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.