शिक्षणातील समृद्धीचा आयाम- क्वेस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निलांबरी जोशी

विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या गतीचं मोजमाप करून त्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचं यश ‘पिसा’ या उपक्रमाद्वारे मोजले जाते. 2008 मध्ये फिनलंड ‘पिसा’च्या यादीत टॉपर होता. तेच हिंदुस्थानमधलं चित्र पाहायला गेलं तर ग्रामीण भागातल्या आठवीच्या वर्गातल्या चारपैकी एका मुलाला वाचता येत नाही. हे चित्र पालटत मुलांमधील शैक्षणिक प्रगतीला योग्य आयाम देता यावा आणि शिक्षणातील गुणवत्ता सुधारावी याकरिता क्वेस्ट ही संस्था काम करते.

तुम्हाला काय हवंय, तुम्हाला कशाची आवड आहे याची आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये सोय नाही. तसे शिक्षक आणि पालक यांच्याकडून प्रयत्नही होताना दिसत नाहीत. उत्तम पैसा मिळवला की, आपलं मूल सुखी होईल, सुखी कसं होईल तर उत्तम नोकरीमुळे, उत्तम नोकरी कशी मिळेल तर ती उत्तम डिग्रीमुळे, उत्तम डिग्री कशी मिळेल तर परीक्षेच्या दिवशी सगळं लक्षात राहिल्यामुळे. म्हणजे आपण शिक्षणाविषयी बोलत नाही तर परीक्षेविषयी बोलतो. त्यातून बंदिस्त डेव्हलपमेंट ‘यशाच्या गावी जाताना’ या कार्यक्रमात डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीत अतुल कुलकर्णी या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्यानं हे विचार मांडले होते.

हीच परीक्षा जर शाळेतून काढून टाकली तर काय होऊ शकतं याचं उदाहरण फिनलंड या देशानं राबवलेल्या शिक्षणविषयक धोरणांमधून मिळालं आहे. 1980 साली फिनलंडमध्ये खासगी आणि सरकारी शाळा असा भेदभाव बंद करून श्रीमंत, गरीब सगळ्यांना एकाच प्रकारचं उत्तम शिक्षण मिळेल अशी व्यवस्था सरकारनं केली. आज फिनलंडमध्ये मुलांना वयाच्या 16व्या वर्षांपर्यंत परीक्षा द्याव्या लागत नाहीत. मुलांना आणि शिक्षकांना तिथे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. ‘प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट ऍसेसमेंट – पिसा’ या कार्यक्रमाअंतर्गत अनेक देशांमधल्या शिक्षण व्यवस्थांचं मूल्यमापन केलं जातं. 15 वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान आणि वाचन याबाबतीतल्या गतीचं मोजमाप करून त्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचं यश ‘पिसा’ मोजते. 2008 साली फिनलंड ‘पिसा’च्या यादीत टॉपर होता. 2012 साली वाचनाच्या बाबतीत फिनलंड सहावा तर गणितात बाराव्या स्थानावर होता. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या क्रमवारीमध्ये तर फिनलंडची शिक्षण व्यवस्था पहिल्या क्रमांकावर आहे.

तेच हिंदुस्थानमधलं चित्र पाहायला गेलं तर हिंदुस्थानच्या ग्रामीण भागातल्या आठवीच्या वर्गातल्या चारपैकी एका मुलाला वाचता येत नाही. आठवीच्याच वर्गातल्या दोनपैकी एका मुलाला साधा भागाकार करता येत नाही. ‘आयआयएम अहमदाबाद’ मधल्या काही विद्यार्थ्यांनी ‘एज्युकेशनल इनिशिएटिव्हज्’ हा ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपनं 2006 साली महानगरात अग्रेसर असणाऱया शाळांमध्ये शिकणाऱया 30 हजार मुलांवर एक सर्वेक्षण केलं. त्यातल्या एका प्रश्नात त्यांनी फूटपट्टीच्या शेजारी एक 5 सेंमी लांबीची पेन्सिल ठेवली. पट्टीवर 1 सेंमी आणि 6 सेंमीच्या मध्ये ती पेन्सिलची टोकं दिसत असताना चौथीच्या मुलांपैकी फक्त 11 टक्के मुलांना पेन्सिलची लांबी सांगता आली.

पण सरकार काय करतं? असा विचार करत बसण्यापेक्षा सरकारी शाळांमधल्या शिक्षकांना वर्गात शिकवताना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल या विचारानं ‘क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट – क्वेस्ट’ ही संस्था अतुल कुलकर्णी या अभिनेत्यानं इतर सहकाऱयांच्या मदतीनं 2007 साली स्थापन केली. ‘क्वेस्ट’ची सुरुवात कशी झाली, तर ठाणे जिह्यातल्या आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही लोकांनी ‘ठाणे स्टडी ग्रुप’ स्थापन केला होता. वर्गात शिकवल्या जाणाऱया गोष्टींचा आयुष्यातल्या शाळेतले प्रश्न सोडवताना उपयोग होत नाही, पुस्तकी ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्षात कृती करताना होत नाही हे सगळीकडेच दिसून येतं. ही समस्या सोडवण्यासाठी ‘ठाणे स्टडी ग्रुप’ कार्यरत होता. त्यांचं काम विस्तारत जाऊन नंतर ‘क्वेस्ट’ सुरू झालं. शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारावी हे क्वेस्टचं ध्येय आहे. आपल्या निरनिराळ्या उपक्रमांद्वारे ‘क्वेस्ट’ आज 3 ते 14 या वयोगटातल्या 93888 मुलांपर्यंत पोहोचलं आहे असं या संस्थेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालातून दिसून येतं.

विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे शिक्षणाचे तीन कोन आहेत. यातल्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर ‘प्रत्येक मूल प्रत्येक क्षणी शिकत असतं. पण त्यासाठी मुलांनी उघडय़ा डोळ्यांनी सगळीकडे पाहायला हवं, वस्तू हाताळायला हव्यात, मोडतोड करायला हवी, खूप ऐकायला हवं’ असं जॉन होल्ट हा शिक्षण तज्ञ आपल्या ‘लर्निंग ऑल द टाईम’ या पुस्तकात म्हणतो.

शिकायची ही पद्धत आणि संसाधनं विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचं काम प्रामुख्यानं शिक्षक करतात, पण म्हणजे नक्की काय करायचं, मुलांपर्यंत कसं पोहोचायचं हे मात्र शिक्षकांना शिकवलं जात नाही. कित्येक गावातल्या शिक्षकांना आपली माहिती, कौशल्यं आणि ज्ञान विकसित करण्याची इच्छा असूनही त्यांच्यापर्यंत संसाधनं पोहोचत नाहीत. त्यासाठी ‘क्वेस्ट’नं ‘शिक्षक मित्र’ हा उपक्रम चालू केला. वर्गात मुलांबरोबर संवाद कसा साधावा, शिकवण्याच्या कोणत्या पद्धती जास्त परिणामकारक ठरतात याबद्दल या उपक्रमात शिक्षकांना शिकवलं जातं. प्रादेशिक भाषांमध्ये शिकवण्याची संसाधनं त्यांना उपलब्ध करून दिली जातात.

आपल्या ‘पुस्तकगाडी’ या उपक्रमाद्वारे ‘क्वेस्ट’ 10 आश्रमशाळांमध्ये सुमारे 1000 पुस्तकं, कॉम्प्युटर आणि प्रोजेक्टर यांनी भरलेली व्हॅन घेऊन पोहोचते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात वाचनाची आवड जोपासावी आणि मल्टिमीडिया मूलांपर्यंत पोहोचावा हा या उपक्रमाचा हेतू आहे. ‘क्वेस्ट’च्या ‘पालवी’ या उपक्रमाद्वारे अगदी लहान म्हणजे 3 ते 6 वर्षांच्या मुलांना शिक्षण दिलं जातं. ‘अंकुर’ हा प्रकल्प अंगणवाडय़ांना मदत करतो. अंगणवाडय़ांच्या कार्यकर्त्यांसाठी ‘क्वेस्ट’नं सहा टप्प्यांतला एक कोर्स तयार केला आहे. ‘अनुपद’ या उपक्रमात अभ्यासात मागे पडलेल्या नापास मुलांना शिकायला मदत केली जाते.

या उपक्रमांमुळे मुलांना कशी प्रेरणा मिळाली याची अनेक उदाहरणं आहेत. त्यापैकी एक उदाहरण तेजल राऊत या मुलीचं आहे. तेजलनं 2008 साली ‘क्वेस्ट’च्या एका उपक्रमासाठी पर्यावरणासंदर्भात – A study of weather in sonale असा प्रकल्प सादर केला. तो प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर निवडला गेला. आपला प्रकल्प सादर करताना ‘वाडा’ या गावाबाहेर कधीच न पडलेली तेजल नागालॅंडला गेली. इतकंच नव्हे तर तिला या प्रकल्पासाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याकडून पारितोषिकही मिळालं. ‘क्वेस्ट’च्याच ‘शिक्षण समृद्धी केंद्रा’त तेजल आता शिकवण्याचं काम करते आहे..

दुसरं उदाहरण भूषण पातारे या विद्यार्थ्याचं आहे. दाढारे गावातल्या भूषणनं ‘विजेच्या दिव्यांच्या ऊर्जेचा योग्य वापर’ या विषयावर 36 घरांमध्ये मित्रांसोबत जाऊन सर्वेक्षण केले. त्यावरचा त्याचा प्रकल्प त्यानं आधी स्थानिक आणि नंतर राज्यस्तरावर सादर केला. अहमदाबादच्या 2009 सालच्या ‘नॅशनल चिल्ड्रेन सायन्स कॉंग्रेस’मध्ये त्याच्या या प्रकल्पाची निवड झाली. तेव्हा आपल्या प्रकल्पाची माहिती त्यानं दूरदर्शनवरही सादर केली. भूषण आता ‘क्वेस्ट’मध्येच बालमित्र म्हणून काम करतो.

‘तुम्ही स्वतःसाठी जे काही करता ते तुमच्याबरोबर संपतं, पण दुसऱयांसाठी जे करता ते चिरकाल टिकतं’ हे ‘क्वेस्ट’नं स्वतः दाखवून दिलंच आहे, पण ते अशा बालमित्रांमध्ये रुजलेलंही दिसून येतं हे संस्थेचं खरं यश!

[email protected]