कडेकोट सुरक्षेचे तीनतेरा; थेट संसदेत पोहोचले माकड

नव्या संसद भवनाला गळती लागल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी संसद भवनातील खासदारांच्या लॉबीत एका माकडाची एण्ट्री झाली. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संसदेत शुक्रवारी बजेटवर चर्चा सुरू असताना अचानक खासदारांच्या लॉबीत एक माकड घुसले. एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला.

या व्हिडीओत माकड सोफ्यावर बसलेले दिसत आहे. तसेच इकडून तिकडे उडय़ा मारताना दिसत आहे. संसद परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना माकड खासदारांच्या लॉबीपर्यंत कसे काय घुसले?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दिल्लीतील पहिल्याच मुसळधार पावसात हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या संसद भवनाला गळती लागल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. आता थेट संसद भवनातील खासदारांच्या लॉबीत माकड घुसले. या घटनेची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर सुरू होती.