महायुतीत श्रेयावरून खटके, अजितदादा, जनाची नाही तर मनाची तरी ठेवा!राधाकृष्ण विखे-पाटलांची भरसभेत टीका

महायुतीच्या नेत्यांमधील कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडत आहेत. इथेनॉल धोरण लागू करण्याच्या श्रेयावरून भाजप नेते व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी इथेनॉल धोरण लागू करून साखर कारखानदारी जीवनदान देऊन जिवंत केली. त्यांनी कारखानदाराला नाही तर आपल्याला जीवनदान दिले आहे. पण अजित पवारांच्या साखर कारखान्यात अशा नेत्यांचे आभार मानणारा एक बॅनर लावला नाही किंवा कारखान्याच्या सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव केला नाही. जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी, असे म्हणत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

मी कधीच कुणाचा बॅनर लावत नाही – अजित पवार

विखे-पाटील यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. मी कधीच कुणाच्या अभिनंदनाचा बॅनर लावत नाही. साखर कारखान्याचा संचालक म्हणून शेतकऱ्याच्या उसाला चांगला भाव आणि कामगारांना मानधन कसं देता येईल याकडे मी लक्ष देतो. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचे धोरण केंद्र सरकारने आणलेल्या धोरणामुळे साखर कारखानदारीला मदतच झाली आहे. त्याबद्दल मोदी व शहा यांचे मी जाहीरपणे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.