
उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे मातीची भांडी बनवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरीब व्यक्तीला जीएसटी (GST) विभागाकडून तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस मिळाल्यापासून पीडित व्यक्ती आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला असून परिसरात याबाबच चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शहीद असे त्यांचे नाव असून रघुवीरगंज बाजार परिसरात राहतात. मोहम्मद शहीद हे अशिक्षित असून ते आपला पिढीजात मातीची भांडी आणि खेळणी बनवण्याचा व्यवसाय करतात. नुकताच त्यांना केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (GST) विभागाकडून 1 कोटी 25 हजार 297 रुपयांची नोटीस पाठवण्यात आली. ही अवाढव्य रक्कम पाहून शहीद यांना धक्काच बसला. ते साधा मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय करणारे असून त्यांना एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नाहीए.
पीडित मोहम्मद शहीद हे कस्बा येथील रघुवीरगंज बाजारामध्ये राहतात. त्यांची कोणतीही व्यावसायिक फर्म किंवा कंपनी नाही. ते केवळ कुल्हड आणि मातीची भांडी विकून घर चालवतात. आपल्याला कोणत्या तरी मोठ्या कटात जाणीवपूर्वक अडकवण्यात आल्याचा संशय मोहम्मद यांनी व्यक्त केला आहे. त्यांचा पॅन कार्ड नंबर संबंधित विभागापर्यंत किंवा फसवणूक करणाऱ्यांपर्यंत कसा पोहोचला, याबाबत त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
पीडित कुटुंबाने आता प्रशासनाकडे मदतीची याचना केली आहे. “जर ही नोटीस मागे घेतली नाही, तर घर विकूनही आम्ही इतकी मोठी रक्कम भरू शकणार नाही,” असे शहीद यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांना न्याय द्यावा आणि ही बनावट नोटीस रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.




























































