
सामना ऑनलाईन, मुंबई
राफेल विमान खरेदीच्या मुद्दय़ावरून भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आज जोरदार घोषणायुद्ध व बॅनरबाजी झाली. ‘राहुल गांधी माफी मांगो’ अशा घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानातील मुंबई काँग्रेस कार्यालयावर आणि बॅलार्ड पीयर येथील प्रदेश कार्यालयावर निदर्शने केली. मात्र काँग्रेसने कार्यालयाबाहेर ‘राफेल चोरों का हार्दिक स्वागत’ असे पोस्टर लावून भाजप कार्यकर्त्यांचे उपरोधिक स्वागत केले.
राफेलप्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने स्पष्टता केल्यानंतरही काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी वारंवार भाजप सरकारवर खोटे व बिनबुडाचे आरोप करीत असल्याच्या निषेधार्थ मुंबई भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर जोरदार निदर्शने केली. राहुल गांधी यांच्या बॅनरवर भाजप कार्यकर्त्यांनी शाई फेकली. ‘राहुल का झूठ हारा राफेल का सच जिता’, ‘राहुल गांधी हाय हाय’ अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी पोस्टर झळकवली. त्याचवेळेस भाजप कार्यकर्त्यांनी आझाद मैदानातील काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
तर दुसरीकडे काँग्रेसने भाजपच्या कार्यकर्त्यांचे ‘राफेल चोरो का स्वागत’ अशी पोस्टर्स मुंबई व प्रदेश काँग्रेसच्या बाहेर झळकवली. भाजपच्या मोर्चाची कुणकुण लागल्याने काँग्रेसने आधीच तयारी करत पोस्टर्स तयार करून ठेवली होती.
चोराच्या उलटय़ा बोंबा
भाजपचा हा मोर्चा म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा, अशा शब्दांत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘राफेल चोर आणि वर शिरजोर’ अशी भाजपची अवस्था झाली आहे. चोरी करणाऱ्या चौकीदाराला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा निकराने सुरू राहील असे ते म्हणाले.
जशास तसे उत्तर देऊ
‘चोरो को सब नजर आते है चोर’ अशा शब्दांत मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार ऍड. आशीष शेलार यांनी उत्तर दिले. राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. भाजप सरकारच्या बदनामीचे षड्यंत्र काँग्रेसने असेच सुरू ठेवले तर आम्ही जशास जसे उत्तर देऊ, असा इशारा शेलार यांनी दिला.




























































