
विशेष प्रतिनिधी । नवी दिल्ली
राफेल प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी)मार्फत करण्याची मागणी काँगेसने लावून धरल्याने आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. राफेलच्या मुद्दय़ाला कावेरी जलवाटप आणि आंध्रला विशेष पॅकेज देण्याच्या मागणीची जोड मिळाल्यामुळे सभागृहांतील गदारोळ वाढला. परिणामी राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले, तर लोकसभेत गदारोळातच कामकाज उरकावे लागले.
राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्यांनी राफेल प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी करा, अशी मागणी करत घोषणाबाजीला सुरुवात केली. त्याचवेळी तेलगू देसमचे खासदार आंध्र प्रदेशला विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी करत वेलमध्ये धावले. त्यामुळे खासदारांचा एकंदरीत रागरंग पाहता सभापती वैकंय्या नायडू यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
लोकसभेतही राफेलवरून गदारोळ झाला. कामकाज सुरू होताच अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र राफेलवरून भाजप व काँग्रेस खासदारांमध्ये नेहमीप्रमाणे आरोप -प्रत्यारोप सुरू झाले. त्यामुळे गोंधळाला सुरुवात झाली. त्याचवेळी तेलगू देसमचे खासदारही आंध्र प्रदेशला विशेष आर्थिक पॅकेज द्यावे या मागणीसाठी आक्रमक झाले. अण्णा द्रमुकच्या खासदारांनी कावेरी पाणीवाटपाच्या मुद्दय़ावरून वेलमध्ये धाव घेतली. त्यामुळे सभापतींनी कामकाज सुरुवातीला दुपारी 12 व नंतर 2 पर्यंत तहकूब केले.

























































