धक्कादायक… मोखाड्याच्या चास सरकारी आश्रमशाळेत रॅगिंग

आदिवासी आश्रमशाळेतील रॅगिंगच्या प्रकारामुळे मोखाडा तालुका हादरला आहे. चास येथील सरकारी आश्रमशाळेत अज्ञात टवाळखोर मुलांनी गाढ झोपेत असलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील केस आणि भुवया ब्लेडने कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरले असून तणावात आहेत. मुले रॅगिंगला बळी पडत असल्याने पालक भयभीत झाले असून आश्रमशाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात आहे.

आठवीत शिकत असलेला सुविदास जाधव हा 14 वर्षांचा मुलगा शुक्रवारी 12 डिसेंबरच्या रात्री गाढ झोपेत असताना अज्ञात टवाळखोर मुलांनी त्याच्या डोक्याचे केस व डोळ्यांच्या भुवया ब्लेडच्या सहाय्याने काढल्या. सकाळी झोपेतून उठल्यानंतर घडला प्रकार सुविदासच्या लक्षात आला. यानंतर शाळेत एकच खळबळ उडाली. शिक्षकांनी टवाळखोर मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू केले. मात्र दोन दिवसांनंतर पुन्हा सोमवारी 15 डिसेंबरच्या रात्री शक्तिमान सोरे या विद्यार्थ्याच्या डोक्यावरील केस ब्लेडच्याच सहाय्याने कापण्यात आले. पाठोपाठ रॅगिंगच्या घटना घडल्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चास आश्रमशाळा वसतिगृहात दोन रॅगिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे तेव्हापासून अशा घडलेल्या नाहीत. मी स्वतः वसतिगृहात मुक्कामास थांबतो आहे. दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

– पी. पी. सोनवणे, वसतिगृह अधीक्षक