1 मिनिट 13 सेकंदांत चक्रासन करीत उतरला 102 पायऱ्या ; सहा वर्षीय राघवचा अनोखा विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

योगासनांमध्ये चक्रासन हा भल्याभल्यांना घाम फोडणारा आसन प्रकार. त्यातही चक्रासन अवस्थेत पायऱया उतरण्यासाठी मोठे कौशल्य लागते. अशक्यप्राय वाटणारी ही गोष्ट नागपूर शहरातील बाजीप्रभूनगर येथे राहणाऱया सहा वर्षीय राघव भांगडे या चिमुकल्याने सहज साध्य करून दाखवली आहे. राघवने रविवारी चक्रासनात विक्रम प्रस्थापित केला आहे.

अवघ्या 1 मिनिट 13 सेकंदांत पाच मजली इमारतीच्या तब्बल 102 पायऱया चक्रासन करीत तो खाली उतरला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याच्या या कामगिरीची दखल घेतली असून सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. क्रीडामंत्री सुनील केदार यांनीदेखील राघवचे कौतुक केले आहे. राघवच्या या कामगिरीवर त्याचे वडील साहिल भांगडे यांनी आनंद व्यक्त करत या यशाचे श्रेय राघवच्या मेहनतीला आणि त्याला घडवणाऱया प्रशिक्षकाला जाते असे म्हटले आहे. राघवने यापूर्वीदेखील दोन विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत. 2019 मध्ये वयाच्या पाचव्या वर्षी एका मिनिटात 125 टाईल्स फोडण्याचा, त्यानंतर 2020 मध्ये 1 मिनिट 51 सेकंदांत चक्रासनात 102 पायऱया चढण्याचा विक्रम राघवने केला होता.