
सामना प्रतिनिधी । राहाता
काँग्रेस व भाजप शेतकऱ्यांचा एक नंबरचा शत्रू असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना खासदार आणि आमदारच जबाबदार आहेत, त्यांच्याविरोधात रान उठविण्याची वेळ आता आली आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी राहाता येथे रविवारी आयोजित केलेल्या शेतकरी परिषदेत ते अध्यक्षपदावरुन बोलत होते. जेष्ठ नेते लक्षमणराव वडले, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, शिवाजीराव नांदखिले, स्वागताध्यक्ष अॅड. अजित काळे, बाळासाहेब पटारे, शंकरराव गायकवाड, अॅड.बन्सी सातपुते, कॉ.राजेंद्र बावके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
काँग्रेस आणि भाजप दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आयातीला कर लावून निर्यातीला प्रोत्साहन दिल्यास शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के भाव देणे शक्य आहे.परंतू उद्योगपतींना कच्चा माल व मजूर स्वस्तात द्यायचे सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्याच पाहिजे. त्यासाठी सरकारला भूमिका बदलण्यास भाग पाडावे लागेल. हे शक्य झाले नाही तर निवडणुकांच्या माध्यमातून सरकारला घरी पाठवावे लागेल. 1935 पासून पेट्रोलमध्ये इथेनॉल वापराची चर्चा चालू आहे. पण त्याची आंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर इथेनॉल वापराचा निर्णय घेतला असता तर आज उसाला पाच हजार रुपये भाव मिळाला असता. सरकारने शेतकरी संघटनेला फोडण्याचे काम केले. राजु शेट्टी, सदाभाऊ खोत, पाशा पटेल, रविंद्र तुपकर यांनी लबाडीने सत्ता मिळविली, लबाडी हे त्यांचे धेय्य असून हे सर्व सत्तेचे मिंधे आहेत.
लक्ष्मणराव वडले म्हणाले की, आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल. केलेला कायदा बदलता येतो पण ते तुमच्या उग्रतेवर अवलंबून असते. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करताना वडले म्हणाले की, गुजरातमध्ये ऊसाला 4700 रुपये, कोल्हापूरमध्ये 3200 रुपये भाव दिला जातो मग विखे पाटील कारखाना 2000 रुपये भाव कासा काय देतो, असा सवाल त्यांनी केला. या पुढाऱ्यांना ऊसाने बडवल्याशिवाय भाव देणार नसल्याचे वडले म्हणाले. यावेळी बाळासाहेब पठारे, शंकरराव गायकवाड, शिवाजीराव नांदखिले, अॅड.बन्सी सातपुते, कॉ.राजेंद्र बावके, अॅड.अजित काळे यांची भाषणे झाली. राजेंद्र पठारे यांनी स्वागत केले. रुपेंद्र काळे यांनी प्रास्तविक केले. यावेळी अॅड.अजित काळे यांची शेतकरी संघटना युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.































































