
ससून रुग्णालयाशी संलग्न असलेल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सिनियर निवासी डॉक्टरांकडून ज्युनियर निवासी डॉक्टरांवर रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली असून, मंत्रालयातून चव्रे फिरल्यानंतर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ससून प्रशासनाने तत्काळ या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
तक्रारदार निवासी डॉक्टरच्या आईने सोमवारी दुपारी ससून रुग्णालयाच्या प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर ससून प्रशासनाने तत्काळ बैठक घेऊन चौकशी समिती नेमली व या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ज्यांच्या विरोधात तक्रार आली आहे, त्या तिघांना सोमवारीच निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांना वसतिगृहातूनही काढून टाकले आहे. चौकशी समितीची मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती, अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली.
अस्थिव्यंगोपचार विभागात पहिल्या वर्षाला शिकत असणाऱ्या ज्युनियर डॉक्टरांना त्याच विभागातील तीन सिनियर निवासी डॉक्टर कधी अंगावर गार पाणी, तर कधी गरम पाणी ओतून घ्यायला लावत.