राहाता तालुक्यात खुलेआम झाडांची कत्तल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। राहाता

वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशिवार्दाने राहाता तालुक्यात मिल मालकाकडून झा़डांची राजरोस कत्तल सुरू आहे. एकुरखे, गणेशनगर, चितळी व बाभळेश्वर येथे या तोडलेल्या वृक्षांची राजरोस वाहतूक सुरू असून वनविभाग याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. यामुळे वृक्ष प्रेमींमधे संतापाची लाट पसरली आहे.

गेल्या वर्ष भरापासून राहाता तालुक्यातील गणेश परिसरातील राहाता, साकुरी, व परिसरातील गावांमधे बेसूमार वृक्षांची कत्तल सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सरकारने तोडण्यास बंदी घातलेली लिंब, पिंपळ, चिंच, उंबर आदी झाडांची खुलेआम कत्तल करून विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे याची वाहतून दिवसाढवळ्या शहरातील रस्त्यावरून केली जात असतानाही वन विभाग व पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहे. या वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रँक्टर व ट्रॉलीवर अनेकदा नंबरही नसतात.

तोडलेली झाडे एकुरखे, गणेशनगर, चितळी व बाभळेश्वर परीसरात नेली जातात तेथे त्यांचे तुकडे करून शिर्डी व मुंबई येथे विक्रीसाठी पाठविली जात असल्याची माहीती वृक्षप्रेमी देत आहे. राज्य सरकार वृक्ष लागवडीसाठी विभागाला कोट्यावधी रूपये वृक्ष जतनासाठी खर्च करते. विशेष मोहीम राबवून जनजागृती करत असताना त्यांचा विभाग या वृक्ष तोडीला पायबंद घालण्याऐवजी कानाडोळा करत आहे.

वनविभागाची गाडी व पथक दर महिन्याला एक तारीख ते दहा तारखेपर्यंत तपासणी करते. गाडीत बसूनच तपासणी करतानाचे दृष्य नागरिक पाहतात
मात्र त्या पथकाला हि वृक्षतोड व तोडलेली लाकडे कशी दिसत नाही असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला असून वखार चालकांशी असलेल्या सलोख्याच्या संबधा मुळे पथकही कोणतीही कारवाई करत नसल्याने वृक्षतोडीला पाठबळ मिळत आहे. असा आरोप स्थानिकांकडून होत आहे.