लॉकडाऊनमध्ये कोमेजलेला गुलाब पुन्हा फुलतोय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहाता तालुक्यात कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये कोमेजलेला गुलाब आता फुलला आहे. तालुक्यात गुलाबाच्या नवीन लागवडी वाढत आहेत. गुलाबाचे गाव म्हणून ओळख असलेल्या अस्तगाव भागातही गुलाबाचे क्षेत्र वाढू लागले आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री साईबाबांच्या शिर्डीमुळे गुलाबाला हक्काची बाजारपेठ असल्याने तालुक्यात अस्तगावसह अन्य गावांत गुलाबाचे क्षेत्र आहे. गुलाबाची फुले विक्रीतून शेतकरी वर्गाला आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी चांगला हातभार लागत असल्याने अस्तगाव भागात अनेक शेतकरी आपल्या शेतात गुलाबाची शेती करीत आहेत. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे दळणवळण, मंदिरे बंद असल्याने याचा मोठा फटका गुलाब उत्पादकांना बसला. दररोज फुले काढणीला येतात. मात्र, फुलांची विक्री होत नसल्याने ती फुले गाईगुरांना टाकण्याची वेळ त्या वेळी शेतकऱयांवर आली होती.

गुलाब निघायचा, पण त्याला 10 रुपये प्रतिशंभरला भाव मिळायचा. गावातील व्यापारी तो खरेदी करत. दूध वाहतुकीची साधने, ट्रव्हल्सनेही गुलाब ते शहरात पाठवत असत. काही शेतकऱयांना तर आपल्या शेतातील गुलाबात नांगर घालावा लागला. त्यामुळे दीड ते दोन वर्षांत गुलाबाची शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर गुलाबाला इतरत्र पाठविण्यासाठी दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्याने पुन्हा अर्थकारणाचा केंद्रबिंदू ठरलेला गुलाब तालुक्यातील मातीत रुजू लागला आहे.

राज्यासह परराज्यातही मागणी

राहाता तालुक्यातील गुलाब नागपूर, अमरावती, कारंजा, कल्याण, संभाजीनगर, तसेच परराज्यातील सुरत येथेही आता जाऊ लागला आहे. मागील आठवड्यात गुलाबाला 70 ते 100 रुपये शेकडा भाव होता, तो या आठवडय़ात 55 ते 60 रुपयांपर्यंत खाली आला. राहाता तालुक्यात एक हजार एकरावर गुलाबाची शेती केली जात असल्याचे गुलाब उत्पादक शेतकरी संजय आप्पासाहेब चोळके यांनी सांगितले. डाळिंबाच्या बागांकडे काणाडोळा करत शेतकऱयांचा गुलाब शेतीकडे, कांद्याचे उत्पादन घेण्याकडे कल यंदा वाढला आहे. तालुक्यातील अस्तगावसह तिसगाववाडी, नांदुर्खी, लोणी, राहाता, चोळकेवाडी आदी भागात गुलाबाचे क्षेत्र वाढले आहे. शिर्डीला गुलाब विक्रीसाठी मार्केट भरते. तेथे 10 टक्के गुलाब विकला जातो. तर, बाहेरील शहरांत 90 टक्के गुलाब पाठविला जातो.