
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
आशियाई क्रीडा स्पर्धेतील शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधत हिंदुस्थानला नेमबाजीत ऐतिहासिक गोल्ड मेडल जिंकून देणाऱया राही सरनोबतला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून ‘अर्जुन’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार गुरुवारी जाहीर करण्यात आला. या ‘अर्जुन’ पुरस्कारानंतर अधिक चांगली कामगिरी करण्यास बळ मिळाल्याची भावना तिने व्यक्त केली. अर्जुनाचा बाण लक्ष्याचा अचूक निशाणा साधायचा, त्याचप्रमाणे शूटिंग रेंजवर अचूक निशाणा लावत देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश मिळवून देणार, असा विश्वासही कोल्हापूरच्या या सुवर्णकन्येने व्यक्त केला.
– ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी राही सरनोबत हिची शिफारस करण्यात आली नव्हती; पण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यानंतर गेल्या आठवडय़ात तिच्या नावाची शिफारस करण्यात आली. यावर ती म्हणाली, सुरुवातीला माझे नाव अर्जुन पुरस्कार यादीत नव्हते. पण आशियाई क्रीडा स्पर्धेतील पटकावलेल्या पदकानंतर चित्रच पालटले. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मेल पाठवून अर्जुन पुरस्कार मला देण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे आगामी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले, असेही ती म्हणाली.



























































