
नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित काँग्रेसच्या ‘वोट चोर गद्दी छोड’ रॅलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवार (14 डिसेंबर 2025) रोजी काँग्रेस पक्ष ‘सत्या’च्या (Truth) बाजूने उभे असल्याचे सांगितले आणि ‘नरेंद्र मोदी-आरएसएस सरकार’ला हटवण्याचे वचन दिले. राहुल गांधी यांच्या सभेला दिल्लीत तुफान गर्दी जमली होती. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल होत असून काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधी यांच्या मुद्द्यांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राहुल गांधींचा हल्लाबोल
रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार टीका केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांची नावे घेत त्यांनी हे अधिकारी भाजपसाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप केला. तुम्ही मोदी शहांचे नाही तर देशाचा निवडणूक आयोग आहे याची आठवण निवडणूक आयोगाला करून द्या असं आवाहन राहुल गांधी यांनी सभेत जमलेल्या लोकांना केलं.
खर्गे यांचा भाजप-आरएसएसवर निशाणा
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही यावेळी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा साधला. ते म्हणाले, “भाजप-आरएसएसचे लोक संविधान संपवण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली हे लोक पुन्हा गरिबांना गुलाम बनवू इच्छितात.” तसेच, “काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, तेव्हा मोदी-शाह यांचा जन्मही झाला नव्हता,” असेही खर्गे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
राष्ट्रपतींना सादर करणार 6 कोटी स्वाक्षऱ्या
कथित मत चोरीविरोधात पक्षाने देशभरातून सुमारे सहा कोटी स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत. या सर्व स्वाक्षऱ्या भारताच्या राष्ट्रपतींना (President of India) सादर करण्यात येणार आहेत.

























































