
भारत जोडो न्याय यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर काँग्रेस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे लवकरच भारत डोजो यात्रा करताना दिसण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानचा एक व्हिडीओ एक्सवरून शेअर केला आहे. यात ते जिउ-जित्सु ही मार्शल आर्टची एक कला सादर करताना दिसत आहेत. पोस्टच्या शेवटी शेवटी ‘भारत डोजो यात्रा कमिंग सून’ असे लिहिले आहे. देशात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आता त्यांना स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्टचे धडे घेण्याच्या दृष्टीने भारत डोजो यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतील, असा अंदाजही बांधण्यात येत आहे.
डोजो म्हणजेच मार्शल आर्टचे ट्रेनिंग सेंटर किंवा स्कूल जिथे सेल्फ डिफेन्स म्हणजेच स्वसंरक्षणासाठी विविध प्रकारचे मार्शल आर्टचे प्रकार शिकवले जातात. हे लक्षात घेता राहुल गांधी लवकरच देशभरातील मुली, महिलांना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देण्यासाठी ठोस पाऊल उचलतील, असे बोलले जात आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये काय?
राहुल गांधी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान रोज सायंकाळी शिबिराच्या ठिकाणी जिउ-जित्सुचा सराव करण्याचा आमचा नित्यक्रम होता. प्रकृती उत्तम ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग होता. हळूहळू आमच्यासोबत अनेक जण सरावासाठी जोडले गेले. मुक्कामाच्या ठिकाणी असलेले तेथील रहिवासी तसेच मार्शल आर्टच्या विद्यार्थ्यांनी अनेकांना एकत्र आणले आणि आम्ही सर्वांनी मिळून जोरदार सराव केला. या आर्टचा तुम्हालाही फायदा व्हावा, तसेच जिउ-जित्सु, अकीडो असे मार्शल आर्ट मन एकाग्र करणारे आणि चित्त शांत करणारे क्रीडा प्रकार असून तुम्हालाही आयुष्यात त्यांचा अवलंब करता यावा यासाठी हे शेअर करत आहे. असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पोस्टच्या शेवटी भारत डोजो यात्रा, लवकरच येत आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.