अल्पसंख्याकांवर, विशेषतः मुस्लिमांवर सतत हल्ले होत असताना भाजप सरकारने ‘मूक प्रेक्षका’ची भूमिका स्वीकारली असल्याचा आरोप रविवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. अशा घटनांमागील ‘अराजकतावादी घटकांविरुद्ध’ कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
भाजपशासित हरियाणा आणि महाराष्ट्रात झुंडशाहीच्या हिंसाचाराच्या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ही मागणी केली आहे.
27 ऑगस्ट रोजी हरियाणातील चरखी दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून पश्चिम बंगालमधील एका मुस्लिम स्थलांतरिताची कथित गोरक्षकांनी मारहाण करून हत्या केली होती. या हल्ल्यात आणखी एक जण जखमी झाला आहे.
महाराष्ट्रात गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून एका वृद्धाला ट्रेनमध्ये शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. ते कल्याणला जात होते. या दोन घटनांचे स्क्रीनशॉट राहुल गांधी यांनी शेअर केले आहेत. हिंसाचार पसरवणाऱ्या बदमाशांना भाजप सरकारकडून मोकळे रान मिळाले आहे, त्यामुळेच त्यांच्यात तसे करण्याची हिंमत वाढली आहे, असे राहुल गांधी यांनी एक्सवर म्हटले आहे.