
कॉर्पोरेट क्षेत्राचा लाखो-करोडो रुपयांचा कर माफ केला, स्वतःसाठी हजारो कोटी रुपयांचे विमान खरेदी केले असे असताना राज्यांना मात्र उधार घेण्यास सांगितलं जातंय अशा शब्दांत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
जीएसटीच्या नुकसान भरपाईबाबत केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. खर्चाची भरपाई करण्यासाठी बाजारातून उधार घेण्याच्या योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे. या प्रस्तावाला अनेक राज्यांनी विरोध दर्शवला आहे. राहुल गांधी याच मुद्दय़ावरून ट्विट करत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्राने राज्यांना जीएसटी महसूल देण्याचे वचन दिले. पंतप्रधान आणि कोरोनाने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. पंतप्रधानांनी कॉर्पोरेट कंपन्यांचा 1.4 लाख कोटी रुपयांचा कर कापला आणि आपल्यासाठी 8,400 कोटी रुपयांचे विमान खरेदी केले. केंद्राकडे राज्यांना देण्यासाठी पैसा नाही. अर्थमंत्री राज्यांना उधार घ्या असे सांगतात. तुमचे मुख्यमंत्री मोदींसाठी तुमचे भविष्य गहाण का ठेवत आहेत. असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

























































