तुम्ही रील बघता तेव्हा पैसा मोदींच्या मित्राच्या खिशात जातो! राहुल गांधी यांनी डागली तोफ

‘देशातील तरुणांनी फेसबुक, इन्स्टाग्रामवरच वेळ घालवावा, केवळ स्वप्ने पाहत राहावी हीच मोदी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी मोबाईल डेटा स्वस्त केला आहे. पण देशातील तरुण जेव्हा रील बघतात तेव्हा प्रत्येक रीलबरोबर मोदींचे मित्र मुकेश अंबानी यांच्या खिशात पैसा जातो, अशी तोफ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज डागली.

बिहारमधील खगरिया, बेगुसराय येथे लागोपाठ झालेल्या निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. राहुल यांनी यावेळी मोदी सरकारच्या ध्येयधोरणांवर जोरदार टीका केली. ‘रील हे केवळ एक स्वप्न आहे. रील बघून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, पोटाला अन्न मिळणार नाही किंवा रोजगारही मिळणार नाही. हे वास्तव आहे, मात्र तरुणांनी आयुष्यभर रील बघत राहावे आणि त्यातून आपल्या मित्राला पैसा मिळावा हे मोदींचे धोरण आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे,’ असे राहुल गांधी म्हणाले. मोदी फक्त ट्रम्प यांनाच घाबरत नाहीत. अदानी-अंबानींनाही घाबरतात. हे दोघे मोदींचे कंट्रोलर आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

छातीचा आकार आणि हिमतीचा संबंध नसतो!

छातीच्या आकारावरून माणसाच्या हिमतीचा अंदाज येत नाही. गांधीजी सुपरपॉवर इंग्रजांशी लढले. त्यांची छाती मोठी नव्हती. तरी ते घाबरत नव्हते. मात्र काही लोकांची छाती 56 इंचाची असूनही ते डरपोक आहेत, असा सणसणीत टोला राहुल यांनी नरेंद्र मोदी यांना हाणला. ‘1971 च्या युद्धावेळी हिंदुस्थान-पाकिस्तानची लढाई सुरू असताना अमेरिकी नौदलाने जहाजे पाठवली होती. अमेरिकेने आपल्यावर प्रचंड दबाव आणला होता, पण इंदिरा गांधी घाबरल्या नाहीत. जे करायचे होते ते त्यांनी करून दाखवले, असे राहुल म्हणाले. आता डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला तरी मोदी घाबरतात. ट्रम्प म्हणाले, ऑपरेशन सिंदूर बंद करा. यांनी बंद करून टाकले, असे राहुल म्हणाले.