तब्येत खालावलेली असतानाही कसे काम करता! राहुल गांधींचा पर्रिकरांना प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi

सामना ऑनलाईन, पणजी

गेले 2 दिवस विश्रांतीसाठी गोव्यात असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज विधानसभेत येऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तब्बेतीची चौकशी केली. यावेळी राहुल गांधी यांनी पर्रिकरांना ‘लवकर बरे व्हा’ असे म्हणत सदिच्छा व्यक्त केली.

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवारपासून सुरु झाले.गंभीर आजारी असून देखील मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर या अधिवेशनाला उपस्थित राहिले आहेत. गोव्यात सुट्टीसाठी आलेले राहुल गांधी यांनी अधिवेशनासाठी विधीमंडळात हजर असलेल्या पर्रिकरांना भेटण्याचं ठरवलं होतं. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेचे आजच्या दिवसाचे कामकाज संपले. यानंतर राहुल गांधी यांनी विधीमंडळाच्या मागील बाजूने प्रवेश करत पहिल्या मजल्या वरील मुख्यमंत्रीकक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार राहुल गांधी यांची भेट सदिच्छा होती.तब्बेत इतकी खालावली असताना देखील तुम्ही ही सगळी कामे कशी करता? असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला.त्यावर पर्रिकर यांनी ‘आपला हा स्वभाव असून आपण जे ठरवतो ते करतो त्यामुळे आपल्याला त्याची सवय झाली आहे’ असे सांगितले. राहुल यांनी आपल्या आईच्या वतीने पर्रिकर यांना शुभेच्छा देतानाच दिल्ली मधील प्रदूषणाला कंटाळून आपण हवा पालट करण्यासाठी गोव्यात अधून मधून येत असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेतल्या नंतर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या विनंतीला मान देऊन विरोधी पक्षाच्या दालनात जाऊन काँग्रेस आमदारांची भेट घेतली.पुढच्या महिन्यात राजकीय भेटीवर गोव्यात येणार असल्याचे त्यांनी काँग्रेस आमदारांना सांगितले. सोमवारीच राहुल गांधी यांनी राफेल ऑडीओ क्लिप वर अद्याप कोणतीच करवाई झाली नसल्याने त्या क्लिप मधील माहिती खरी आहे अस म्हणायला वाव असल्याचे ट्वीट करत मुख्यमंत्री पर्रिकर यांना चिमटा काढला होता.