
लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात सहा हजार मते वगळल्याचा आरोप केला. त्यानंतर राजुरा चर्चेत आले आहे. इथे काँग्रेसने सुभाष धोटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, जवळपास तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. निवडणुकीत भाजपचे देवराव भोंगळे हे विजयी झाले. या निवडणुकीत मतदार यादीत शंभर टक्के घोळ झालेला आहे. हा मुद्दा माननीय राहुल गांधी यांनी उचललाय. आणि त्यापूर्वी आम्ही राजुराच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती, असे सुभाष धोटे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात कशी झाली मतचोरी? राहुल गांधीकडून पोलखोल
राजुरा मतदारसंघाच्या निकालानंतर पराभवाचे विश्लेषण करताना सुभाष धोटे यांना अनेक गंभीर बाबी दिसून आल्या. लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात 18 हजार मते वाढली. एवढी माते कशी वाढली? याचा संशय आल्याने धोटे यांनी निवडणुकीपूर्वी तक्रार केली. त्यावरून सुमारे सहा हजारावर मते आयोगाने वगळली होती. उरलेल्या अकरा हजारांहून अधिक मतांमध्येही बोगस मतदार असल्याचा मोठा आरोप धोटे यांनी केला आहे.
राहुल गांधींनी आरोप करताच केंद्रीय निवडणूक आयोगाचेही लगोलग स्पष्टीकरण, काय दिलं उत्तर? वाचा सविस्तर…
कर्नाटकात काँग्रेसची मते वगळण्यात आली तर, राजुरा येथे भाजपने बोगस मतदार वाढवले, असा आरोप आहे. लगतच्या तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यातील नागरिकांना इथे मतदार दाखवण्यात आल्याचा आरोप सुभाष धोटे यांनी केला. जी सहा हजारांवर मते वगळली होती त्याच्यावर काय कारवाई केली, अशी विचारणा आम्ही तहसिलदारांकडे केली होती. ही नावं कोणी दाखल केली होती. आम्ही पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल केला आहे. यानंतर संबंधित पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांनाही आम्ही भेटलो. आयोगाकडून डाटा मागवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पण निवडणूक आयोगाकडून कुठलाही डाटा पोलिसांना मिळालेला नाही. आणि निवडणूक आयोग जोपर्यंत माहिती देत नाही आम्ही कुठलीही कारवाई करू शकत नाही, असे पोलिसांनी सांगितले. राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील बोगस मतदारांचा जो मुद्दा उपस्थित केला, तसाच प्रकार महाराष्ट्रातही घडला असेल. राजुरात जे घडलं तसंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात घडलं असेल, असा गंभीर आरोप सुभाष धोटे यांनी केला आहे.